युद्धजन्य परिस्थितीत घरगुती गॅसचा काळाबाजार; राज्यात पहिला गुन्हा दाखल

---Advertisement---

 

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाची धग आता देशातही जाणवू लागली असून एलपीजी गॅसच्या दरवाढीसोबतच काही ठिकाणी काळाबाजारही वाढल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशभरात अत्यावश्यक वस्तू कायदा लागू केला आहे. तरीही काही ठिकाणी घरगुती गॅसचा अवैध वापर सुरू असल्याने प्रशासनाने कारवाईला सुरुवात केली असून राज्यातील पहिला गुन्हा पंढरपुरात दाखल झाला आहे.

पंढरपूर येथील सांगोला नाका परिसरात घरगुती गॅस सिलेंडर रिक्षामधून अवैधरित्या विक्री केली जात असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाला मिळाली होती. त्यानुसार पुरवठा विभागाच्या भरारी पथकाने धाड टाकून ८ घरगुती व ५ व्यावसायिक असे एकूण १३ गॅस सिलेंडर जप्त केले. या प्रकरणी गणेश बोरीकर यांच्याविरोधात पंढरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या सिलेंडरचा पुरवठा करणाऱ्या गॅस एजन्सीचा शोधही भरारी पथक घेत आहे.
दरम्यान, व्यावसायिक गॅसचा पुरवठा कमी झाल्याने राज्यातील अनेक ठिकाणी हॉटेल व्यावसायिकांकडून घरगुती गॅस सिलेंडरचा वापर होत असल्याच्या तक्रारी शासनाकडे येत आहेत. गोंदिया येथेही अशाच तक्रारीनंतर स्थानिक प्रशासनाने दोन हॉटेल्सवर कारवाई करून ७ घरगुती गॅस सिलेंडर जप्त केले.

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम देशावरही होत असून एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसायावरही मोठा परिणाम होत आहे. दरम्यान, पुरवठा विभागाने ग्राहकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे सांगितले आहे. मात्र काही गॅस पुरवठादारांकडून ग्राहकांना २५ दिवसांनंतरच सिलेंडर बुक करण्यास सांगितले जात असल्याचेही समोर आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---