मुंबईत खळबळ! प्रेस क्लबला बॉम्बने उडवण्याची धमकी; पोलीस आणि BDDS अलर्ट

---Advertisement---

 

मुंबईत एक धक्कादायक प्रकार समोर आला असून मुंबई प्रेस क्लबला धमकीचा ईमेल मिळाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या ईमेलमध्ये प्रेस क्लबच्या परिसरात गॅस बॉम्ब ठेवल्याचा दावा करण्यात आला असून दुपारी १ वाजता स्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली होती.

घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षेच्या दृष्टीने परिसराला वेढा घालण्यात आला असून बॉम्ब शोध व नाशक पथक तसेच श्वान पथकांना घटनास्थळी तैनात करण्यात आले आहे. संपूर्ण परिसराची सखोल तपासणी करण्यात येत असून प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

प्राथमिक तपासात हा धमकीचा ईमेल “नीरजा अजमल खान” या नावाने पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या ईमेलमध्ये काही राजकीय स्वरूपाचे दावे करण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास आता सायबर पथकांकडे सोपवण्यात आला असून ईमेल ‘प्रोटॉन मेल’द्वारे पाठवण्यात आल्यामुळे त्याचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा प्रकारच्या सुरक्षित ईमेल सेवेमुळे तपास अधिक गुंतागुंतीचा होऊ शकतो, असेही सूत्रांनी सांगितले.

सध्या तरी घटनास्थळी कोणताही स्फोटक पदार्थ आढळून आलेला नाही. मात्र, संभाव्य धोका लक्षात घेता पोलीस यंत्रणा पूर्णपणे सतर्क असून परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

या घटनेमुळे मुंबईत पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून नागरिकांमध्येही चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---