---Advertisement---
Jalgaon Crime : शहरात भरदिवसा घरफोडी, ६३ हजारांचा मुद्देमाल लंपास कुटुंबातील सदस्य बाहेर गेल्याची संधी हेरत चोरट्यांनी अपार्टमेंटवर डोळा ठेवला. दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात एन्ट्री केली. कपाटातील सामान अस्ताव्यस्त करत ६३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेत पोबारा केला. बुधवारी (६ ऑगस्ट) सकाळी सव्वाआठ ते दुपारी तीन वाजेच्या दरम्यान ही चोरी शहरातील टीएम नगर उज्ज्वल अपार्टमेंट येथे घडली.
या प्रकरणी बुधवारी (१३ ऑगस्ट) एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पंकज शंकरलाल तोलानी (वय ३५, रा.टीएम नगर, प्लॉट नं. ७७ फ्लॅट नं. ३०१, उज्ज्वल अपार्टमेंट) हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. घराच्या दरवाजाला कुलूप लावून ते कामानिमित्त बाहेर गेले होते. चोरट्यांनी कडीकोयंडा तोडत घरात प्रवेश केला. गोदरेज कपाट उघडून त्यातील सामान बाहेर अस्ताव्यस्त फेकला.
कपाटात ठेवलेले ४२ हजार किमतीचे १२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील रिंग प्रत्येकी दोन ग्रॅम वजनाचे एकुण सहा नग, १० हजार ५०० रुपये किमतीचे तीन ग्रॅम वजनाचे एक सोन्याची अंगठी, दहा हजार ५०० रुपये किमतीची तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे गळ्यातील एक पॅन्डल असा एकुण ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल नेला. या प्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक विजयसिंग पाटील हे करीत आहेत.