धनादेशाचा गैरवापर: भुसावळ येथील व्यापाऱ्याची २५ लाख रुपयांची फसवणूक

जळगाव : जिल्ह्यात आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. यात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार देखील घडत आहेत. अशाच आर्थिक फसवणुकीचा गुन्हा घडला आहे. यात जिल्ह्यातील भुसावळ शहरात टेमी व्हिला येथील रहिवासी असलेल्या व्यापाऱ्याने दुसऱ्या व्यापाऱ्याला मोठ्या विश्वासाने धनादेश दिला होता. परंतु, त्या धनादेशाचे गैरवापर करत तब्बल २५ लाख ५ हजार ६००  रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये २ जानेवारी रोजी दोघांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात आरोपींविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

अदिल रूसी कविना (वय ५७, रा. टेमी व्हिला, भुसावळ) हे त्यांच्या कुटुंबासह  राहतात आणि व्यापाराद्वारे उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडून विश्वासाने २ धनादेश कृष्णा संजय उपाध्याय आणि सुमील नारायण तिवारी (रा. विठ्ठल मंदिर वार्ड, भुसावळ) यांना देण्यात आले होते. मात्र, २९ ऑक्टोबर ते १७ डिसेंबर २०२४ दरम्यान या दोघांनी संगनमत करून १ लाख १५ हजार रुपये आणि २३ लाख ९० हजार ६०० रुपये असे वेगवेगळे चेक परस्पर त्यांच्या खात्यात वर्ग करून फसवणूक केली.

आपली फसवणूक झाल्याचे दिल कविना यांना लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. या फसवणुकीप्रकरणी  आदिल कविना यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यांच्या या तक्रारीनुसार गुरुवार, २ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सुमील नारायण तिवारी आणि कृष्णा संजय उपाध्याय यांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे करत आहेत.