जळगाव : कर्जाच्या ओझ्याने त्रस्त झालेल्या गणेश बंडू बडगुजर (वय ६१, मूळ रा. खेडी कढोली, ता. एरंडोल, ह.मु. नवनाथ नगर, जळगाव) या व्यापाऱ्याने धावत्या रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना सोमवारी (३ फेब्रुवारी) रात्री जळगाव ते शिरसोली दरम्यान घडली.
मुलाला व्हिडीओ कॉल करून दिला शेवटचा निरोप
गणेश बडगुजर यांनी आत्महत्येपूर्वी आपल्या मुलाला व्हिडीओ कॉल करून या टोकाच्या निर्णयाची माहिती दिली. हा कॉल मिळताच कुटुंबीय घाबरले आणि तत्काळ शोध घेत घटनास्थळी पोहोचले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता.
हेही वाचा : मुलीशी अनैतिक संबंध, घरी बोलावून बापाने विवाहित प्रियकराला संपवलं; घटनेमुळे परिसरात खळबळ
पोलिसांची कारवाई
या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस हवालदार अनिल फेगडे व गुलाब माळी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवण्यात आला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कर्जाचा भार सहन न होऊन आत्महत्या
गणेश बडगुजर हे धान्याचे व्यापारी होते. व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाच्या भाराने ते गेल्या काही दिवसांपासून तणावात होते. सततच्या आर्थिक विवंचनेमुळे त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर
गणेश बडगुजर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. या अनपेक्षित घटनेमुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.