Canara Bank heist : कर्नाटकातील विजयपुरा जिल्ह्यातीस कॅनरा बँकेच्या एका शाखेत मोठा दरोडा पडला आहे. या ठिकाणी अत्यंत नियोजनबद्ध दरोडा टाकत दरोडेखोरांनी सुमारे 59 किलो सोन्याचे दागिने आणि 5.2 लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन पोबारा केला आहे. ही घटना 25 मे रोजी मनागुली टाउन येथील कॅनरा बँकेच्या शाखेत घडली. दरोडेखोरांनी अलार्म सिस्टीम बंद करत लॉकर उघडण्यासाठी एका बनावट चावीचा वापर केला. देशातील सर्वात मोठ्या दरोड्यांपैकी हा एक दरोडा असल्याचं बोललं जात आहे.
याबाबत विजयपुराचे पोलिस अधीक्षक (एसपी) लक्ष्मण निंबर्गी यांनी सांगितले की, सोमवारी सकाळी नेहमी प्रमाणे सफाई कर्मचारी बँकेत सफाई करण्यासाठी आला असता त्याच्या लक्षात दरोड्याचा प्रकार आला. यानंतर 26 मे रोजी, मंगोडी येथील कॅनरा बँकेच्या व्यवस्थापकाच्या फिर्यादीवरुन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या दरोड्यात चोरट्यांनी 59 किलो सोने चोरले आहे. हे सोने कर्जासाठी तारण ठेवलेल्या ग्राहकांचे होते. सहा ते आठ दरोडेखारांनी बनावट चावी वापरुन सोन्याचे लॉकर उघडले. दोन दिवस बँकेचे निरीक्षण केल्यानंतर दरोडेखोर बँकेत घुसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
काळ्या रंगाची बाहुली बँकेत ठेवली
दरोडा टाकल्यानंतर दरोडेखोरांनी काळ्या रंगाची बाहुली बँकेच्या खिडकीजवळ ठेवली होती. तपासकर्त्यांना दिशाभूल करण्यासाठी हा प्रकार करण्यात आला. हर्नल आणि हुबळी सारख्या शेजारच्या जिल्ह्यांतील लोकांनी कर्जासाठी या शाखेत त्यांचे सोने गहाण ठेवले होत. गुंतलेल्या मालमत्तेचे प्रमाण आणि मूल्य पाहता, हे देशातील सर्वात मोठ्या बँक दरोड्यांपैकी एक असू शकते अशी माहिती बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.