---Advertisement---
जळगाव : जिल्ह्यात गोवंश तस्करीच्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. या घटनांना आळा बसावा याकरिता पोलीस प्रशासनातर्फे वेळोवेळी कारवाई करण्यात येत आहे. रविवारी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील हे गोवंश तस्करी करणाऱ्या इनोव्हा वाहनाचा मुक्ताईनगरजवळून पाठलाग सुरु केला. त्यांनी हे वाहन अकोला जिल्ह्यात पकडण्यात यश आले. परंतु, वाहनातील तस्करांनी पोलिसांवर हल्ला चढविला. या तस्करांनी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना वाहनाने चिरडण्याचा देखील प्रयत्न केला. या घटनेत ते गंभीर जखमी झाले असून सध्या उपचार घेत आहेत.
पोलिसांनी गोवंश तस्करी करीत असलेल्या संशयावरुन गाडीचा मुक्ताईनगरपासून मलकापूर, नांदुरा, बाळापूरमार्गे पथकाने तब्बल 100 किमी पेक्षा अधिक अंतराचा पाठलाग सुरु केला. पोलिसांनी अकोलाजवळ संबंधित इनोव्हा वाहनाला ओव्हरटेक करून थांबवले. यावेळी संदीप पाटील यांनी गाडीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता, तस्कराने इनोव्हा रिव्हर्स घेत त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. यात त्यांच्या छातीला आणि बरगड्यांना दुखापत झाली असून पाय आणि चेहरा खरचटला आहे. मात्र त्यांनी प्रसंगावधान राखत स्वतःचा बचाव केला.
तरीही संदीप पाटील यांनी हार न मानता वाहन आणि एकास ताब्यात घेतले. मात्र वाहनातील इतर तिघे आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार झाले. यानंतर त्यांनी तात्काळ जिल्हा नियंत्रण कक्षास तसेच खामगाव व अकोला पोलिसांना माहिती दिली. खबर मिळताच अकोला पोलिसांनी त्वरित नाकाबंदी केली. मात्र, आरोपींनी जंगल किंवा ग्रामीण भागात पळून जाऊन पोलिसांना चकवा दिला. घटनास्थळी अकोला पोलिसांनी पंचनामा केला असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.