जागतिक बाजारात तेल दरवाढ; उत्पादन शुल्कात कपात करून केंद्राचा तेल कंपन्यांना दिलासा

---Advertisement---

 

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाल्यामुळे देशातील तेल कंपन्यांवर आर्थिक ताण वाढला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रती लिटर 10 रुपयांची कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, हा निर्णय तात्काळ लागू करण्यात आला आहे.


गेल्या महिनाभरात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 70 डॉलरवरून थेट 122 डॉलरपर्यंत पोहोचले आहेत. पश्चिम आशियातील तणाव आणि जागतिक पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे अवघ्या चार आठवड्यांत सुमारे 75 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. या वाढीचा थेट परिणाम देशातील तेल विपणन कंपन्यांवर झाला आहे.


सध्या पेट्रोलमध्ये सुमारे 26 रुपये प्रतिलिटर तर डिझेलमध्ये तब्बल 81.90 रुपये प्रतिलिटर इतके नुकसान कंपन्यांना सहन करावे लागत आहे. एकत्रितपणे पाहता, सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांचे दररोजचे नुकसान सुमारे 2,400 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे.
किरकोळ बाजारात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्याचे मोठे आव्हान सरकारसमोर होते. ग्राहकांवर थेट भार न पडू देता, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन , भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन या कंपन्यांनी कमी दरात इंधन पुरवठा सुरू ठेवला होता. त्यामुळे त्यांचे नुकसान वाढत होते.


उत्पादन शुल्कातील कपातीमुळे कंपन्यांचे नुकसान प्रति लिटर 10 रुपयांनी कमी होणार असून, या निर्णयामुळे तेल कंपन्यांना अंशतः दिलासा मिळणार आहे. तसेच किरकोळ ग्राहकांवर इंधन दरवाढीचा तात्काळ परिणाम होणार नाही, अशी अपेक्षा केंद्र सरकारने व्यक्त केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---