---Advertisement---
दि. १९ रोजी स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित “चैत्र पालवी स्वरोत्सव” ही सुरेल मैफल गुढी पाडव्याच्या निमित्ताने जळगाव येथील महात्मा गांधी उद्यानात उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली. भक्तीगीत, अभंग, नाट्यगीत आणि सुगम संगीताने सजलेल्या या कार्यक्रमाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाची सुरुवात परंपरेनुसार गुरु वंदनेने करण्यात आली. प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर यांनी गुरु वंदना सादर केली. त्यानंतर जळगावच्या महापौर सौ. दीपमाला काळे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी, आमदार राजूमामा भोळे आणि दीपक चांदोरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
यानंतर सुरेल गायनाचा प्रवास सुरू झाला. वरूण नेवे, सौ. श्रुती जोशी आणि बासरीवादनावर राजेश्वरी रत्नपारखी यांनी आपल्या सादरीकरणाने मैफलीला रंगत आणली. “ओंकार स्वरूपा”, “आरंभी वंदिन अयोध्येचा राजा”, “गगन सदन तेजोमय”, “देवाघरचे ज्ञात कुणाला”, “विष्णुमय जग” यांसारख्या गीतांनी भक्तिरस ओसंडून वाहिला. तसेच बासरीवरील सुरेल सादरीकरणाने वातावरण अधिक प्रसन्न झाले.
“बाजे मुरलिया”, “मी राधिका” आणि “रुणुझुणु रे भ्रमरा” या सादरीकरणांनी कार्यक्रमाला विशेष उंची मिळाली. अखेरीस “अवघा रंग एक झाला” या भैरवीने या सुरेल मैफलीची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाचे ओघवते आणि अभ्यासपूर्ण निवेदन सौ. प्रिती झारे यांनी केले. तर आभार प्रदर्शन सौ. नुपुर खटावकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी स्निग्धा कुलकर्णी तसेच भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन यांचे सहकार्य लाभले.









