---Advertisement---
मुंबई विभागातील वाढती रेल्वे वाहतूक लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात महत्त्वाचे फेरबदल जाहीर केले आहेत. भुसावळमार्गे मुंबई-नागपूर-अमरावती या लांब पल्ल्याच्या मार्गांवरील अनेक गाड्यांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आले असून सुधारित वेळापत्रक १३ आणि १४ एप्रिलपासून टप्प्याटप्प्याने लागू होणार आहे.
नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसच्या वेळेत बदल:
मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेस 12289/12290 या महत्त्वाच्या गाडीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
१२२८९ (मुंबई-नागपूर) : रात्री ७.५५ ऐवजी ८.३५ वाजता सुटणार
१२२९० (नागपूर-मुंबई) : मुंबईत आगमन सकाळी ८.०५ ऐवजी ७.५० वाजता
या बदलामुळे कामकाज आटोपून प्रवास करणाऱ्यांना अतिरिक्त वेळ मिळणार असून, परतीच्या प्रवासात कार्यालयीन वेळेपूर्वीच मुंबईत पोहोचता येणार आहे.
अमरावती एक्स्प्रेसची वेळ बदलली:
अमरावती एक्स्प्रेस 12111 आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री ८.०५ ऐवजी ८.५० वाजता सुटेल.
ठाणे, कल्याण आणि इगतपुरी स्थानकांवरील वेळेत ५ ते १० मिनिटांची सुधारणा करण्यात आली आहे. घाट विभागातील सिग्नलिंग आणि क्रॉसिंगची अडचण कमी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
महानगरी एक्स्प्रेसचा टर्मिनल बदल:
महानगरी एक्स्प्रेस 22177/22178 आता वाराणसीऐवजी बनारस रेल्वे स्थानक येथे सुरू होऊन तेथेच समाप्त होईल.
२२१७७ मुंबई–बनारस : पहाटे १२.१५ वाजता प्रस्थान, दुसऱ्या दिवशी पहाटे ३.४५ वाजता आगमन
२२१७८ बनारस–मुंबई : सकाळी ९.४५ वाजता सुटेल, दुसऱ्या दिवशी सकाळी ११.४० वाजता मुंबईत आगमन
वाराणसी शहरातील वेगवेगळ्या टर्मिनल्सवरील गर्दी कमी करण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे.
विदर्भ एक्स्प्रेसमध्ये किरकोळ बदल
विदर्भ एक्स्प्रेस बडनेरा स्थानकावर सध्या सकाळी ६.०० वाजता पोहोचते; नव्या वेळापत्रकानुसार ती ६.०५ वाजता पोहोचेल.
पुणे-नागपूर गाड्यांच्याही वेळेत बदल
पुणे-नागपूर गरीब रथ एक्स्प्रेस
पुणे-नागपूर एक्स्प्रेस
या दोन्ही गाड्या आता ९.१० ऐवजी सकाळी ९.२० वाजता नागपूरला पोहोचतील.
रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, हे बदल गाड्यांचे सुरळीत आणि सुरक्षित संचालन, सिग्नलिंग व्यवस्थेतील सुधारणा आणि वाढती गर्दी लक्षात घेऊन करण्यात आले आहेत. प्रवाशांनी सुधारित वेळापत्रक तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.









