दिल्ली : राजधानी दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे. ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. या सोहळ्यात भाषण करताना पंतप्रधानांनी सध्या चर्चेत असलेल्या छावा चित्रपटाचा उल्लेख केला. त्यांच्या तोंडून छावाचा उल्लेख होताच संपूर्ण सभागृहात टाळ्या, शिट्ट्या आणि घोषणांनी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
सध्या देशभरात छावा चित्रपटाची जबरदस्त चर्चा सुरू आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास देशभर पोहोचला आहे. याबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले, “आज संपूर्ण देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईने केवळ हिंदीच नव्हे, तर मराठी चित्रपटसृष्टीलाही वेगळी उंची दिली आहे. आणि सध्या छावा चित्रपटाची विशेष चर्चा होत आहे.”
मोदी पुढे म्हणाले, “छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य आणि पराक्रम या चित्रपटामुळे लोकांपर्यंत पोहोचत आहे. त्यांची गाथा शिवाजी सावंत यांच्या कादंबरीने अजरामर केली आणि आज तीच कथा नव्या माध्यमातून पुन्हा जनतेपर्यंत पोहोचत आहे.” मराठी भाषेच्या योगदानावर भाष्य करताना मोदी म्हणाले, “मराठी ही केवळ संवादाची भाषा नाही, तर ती महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख आहे. ही भाषा विज्ञान, तत्त्वज्ञान आणि आयुर्वेद यासारख्या क्षेत्रांमध्येही आपले स्थान निर्माण करत आली आहे. त्यामुळे महाराष्ट्राने नेहमीच नव्या विचारांना, प्रतिभांना वाव दिला आहे.”
समर्थ रामदास स्वामींच्या विचारांचा उल्लेख करत मोदी म्हणाले, “भाषा समाजाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावते. आपल्या मराठी भाषेने महाराष्ट्र आणि राष्ट्रातील विचारांना अभिव्यक्ती दिली आहे. म्हणूनच समर्थ रामदास स्वामी म्हणतात “मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा.”
पंतप्रधानांनी मराठी भाषा संपूर्ण असल्याचे सांगत तिच्या वैशिष्ट्यांवर भर दिला. “मराठीमध्ये शौर्यही आहे आणि सौंदर्यही आहे. येथे वीरता आहे, तर संवेदनाही आहे. मराठीत भक्ती, शक्ती आणि युक्ती यांचा उत्तम संगम आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले. या सोहळ्यात मराठी साहित्य, भाषा आणि चित्रपटसृष्टीच्या योगदानाला सलाम करताना मोदींनी संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी शुभेच्छा दिल्या.