---Advertisement---
---Advertisement---
जळगाव : शहरातील नव्या कोऱ्या रस्त्यांवर वाहनांचे होत असलेले अतिक्रमण हे वाहतुकीस अडथळा ठरत आहे. नवीपेठ परिसरात नव्यानेच झालेल्या रस्त्यावर लावलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांना शहर वाहतुक शाखेने दंडात्मक कारवाई केली. या कारवाईमुळे वाहतुक करणाऱ्या वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.
जळगाव शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. त्यासोबतच जुने रस्त्यांचे नवीन काँक्रीटीकरण होत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. मात्र हे क्षणिक समाधान असल्याचे चित्र सध्यातरी दिसून येत आहे. कारण या नव्या रस्त्यांवर अतिक्रमण वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
---Advertisement---
प्रमुख रस्त्यांवर वाहने करताय अतिक्रमण शहरातील कोर्ट चौक ते चित्रा चौक, चित्रा चौक ते नेरी नाका चौक, नेहरू पुतळा ते टॉवर चौक आणि टॉवर चौक ते शनिपेठ या प्रमुख रस्त्यांवर दुचाकी आणि चार चाकी धारक रस्त्यांच्या मधोमध वाहने लावत असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. तसेच रस्त्याच्या दुतर्फा हॉकर्सधारकांचेही अतिक्रमण होत असल्याने वाहनधारकांना वाहने चालवितांना मोठी कसरत करावी लागत आहे.
शिस्त लागणार कधी ?
जळगाव शहर सुंदर, स्वच्छ, सुटसुटीत असावे अशी अपेक्षा प्रत्येकालाच वाटते. परंतु सुरूवात आपल्यापासून करायला कुणीही तयार नाही. वाहने व्यवस्थित लावावी, नियमानुसार चालवावी याविषयीची शिस्त लागणार तरी कधी? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. शहरात अतिक्रमणाची समस्या मोठी गंभीर असून चालणे देखिल शक्य होत नसल्याचे नागरिक सांगतात.
वाहतूक विभागाकडून धडक कारवाई
शहरातील बेशिस्त वाहतुकिला शिस्त लावण्यासाठी शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक पवन देसले यांची टीम चक्क रस्त्यावर उतरली. गोलाणी व्यापारी संकुलापासून ते थेट चित्रा चौक आणि प्रमुख मार्गावर बेशिस्त पध्दतीने लावण्यात आलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे फोटो काढून त्यांना दंडाची नोटीस पाठविली. शनिवारी दुपारच्या सुमारास होत असलेली ही कारवाई बघुन अनेक वाहनधारकांची वाहने काढतांना मोठी धावपळ उडाली. शहर वाहतुक शाखेने केलेल्या या कारवाईमुळे वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान ही कारवाई नियमीत सुरू रहावी अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे.