जळगाव : दिवाळीच्या दिवसात तसेच विधानसभा निवडणूक मतमोजणीनंतर झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीत, खड्डे आणि धूळयुक्त रस्ते, सफाई कर्मचारी वा नागरिकांकडून कचऱ्यावर प्रक्रिया न करताच थेट जाळले जाणारे कचऱ्याचे ढीग अशा एक ना अनेक कारणांमुळे नोव्हेंबर अखेरीस जळगाव शहरातील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक (एअर क्वॉलिटी इण्डेक्स) २८० पर्यंत खालावलेला होता. गत सप्ताहात हवेचा गुणवत्ता निर्देशांक सुधारला परंतु पुन्हा रविवारी दुपारनंतर जळगाव शहराच्या हवेत प्रदूषणात वाढ झाली असून १०६ पर्यंत
नोंदवली गेली. गेल्या महिन्याभरात जळगाव शहरातील हवेतील गुणवत्ता निर्देशांक (एअर क्वॉलिटी इण्डेक्स) धोकादायक पातळीवर आलेला असल्याचे दिसून आले आहे. धोकादायक पातळीवर असलेल्या दूषित हवेमुळे ज्येष्ठ, आजारी तसेच विशेषतः लहान मुलांच्या श्वसनास त्रास होण्यासह आरोग्य समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मार्च ते जून-जुलै दरम्यान शहर परिसरात बऱ्याच ठिकाणी रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले. बसस्थानक ते कोर्ट चौक परिसरात एका बाजूचे काँक्रिटीकरण झाले असून दुसऱ्या बाजूकडील कॉक्रिटीकरण विधानसभा आचारसंहितेदरम्यान बंद होते. शहरात अनेक परिसरात अजूनही अमृत योजनेंतर्गत भुयारी गटारींचे काम व अन्य जलवाहिन्यांच्या
खोदकामामुळे कॉंक्रिटीकरणाअभावी रस्ते खड्डे व धुळयुक्त आहेत. आमदार सुरेश भोळे यांनी शहरातील रस्त्यांसाठी कोटींचा निधी आणलेला असला, तरी रस्ते दुरुस्ती वा कॉक्रिटीकरणाच्या माध्यमातून धुळीच्या समस्येचे निवारण करण्यावर अजूनही पालिका प्रशासनाला म्हणावे तसे यश आलेले नाही.
जून ते सप्टेंबर या मान्सून दरम्यान पावसामुळे हवेचा गुणवत्ता निर्देशांक सरासरी ८० ते १०० दरम्यान कायम होता. मात्र, ऑक्टोबर हिट व मान्सून माघारीनंतर नोव्हेंबर महिन्यात हवेतील गुणवत्ता स्तर निर्देशांक १२० ते ३२० दरम्यान पोहचला असल्याचे
स्वातंत्र्य चौकात प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या डिजिटल डिस्प्ले बोर्डवर दिसून आले आहे. त्यामुळे जळगाव शहराची हवा ही धोकेदायक मानली जात आहे.
दीपोत्सवात तसेच विधानसभा निवडणूक निकालानंतर फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणाचा स्तर मोठ्या प्रमाणात वाढला होता. याशिवाय शहरातील तसेच बाहेरून येणाऱ्या वाहनांची वाढलेली संख्या, अवजड वाहनांच्या धुरातील कार्बनमुळे. खड्डेयुक्त रस्त्यांमुळे धूलीकणांचे वाढते प्रमाण, नवीन इमारत बांधकाम संख्या, कचरा जाळण्याचे प्रमाण वाढले आहे.
सद्यःस्थितीत जळगाव शहरासह अन्य परिसरातील हवेची गुणवत्ता (एअर क्वॉलिटी इण्डेक्स) चिंताजनक आहे. शिवाय हिवाळा ऋतू सुरू असून धुकेयुक्त वातावरण आणि धूलीकणांमुळे श्वसनाचे विकार, दमा, अस्थमा असे विकार बळावण्याची शक्यता आहे. स्थानिक मनपा प्रशासनाने हवेचे प्रदूषण टाळण्याची उपाययोजना करणे गरजेचे आहे.
जिल्ह्यात हवामान बदलामुळे मोठ्या प्रमाणात हवेचे प्रदूषण वाढत आहे. जळगाव शहरातील स्वातंत्र्य चौक परिसरात हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी डिजिटल फ्लेक्स यंत्रदेखील बसविण्यात आलेते आहे. तसेच प्रदूषण महामंडळातर्फे विद्यापीठांतर्गतदेखील हवेतील गुणवत्ता निर्देशांक (एअर कॉलिटी इण्डेक्स) तपासणी करण्यात येत आहे. जळगाव शहरासह भुसावळ, चोपडा व पाचोरा या शहरांतदेखील हवेची गुणवत्ता तपासण्याचे काम सुरू होणार आहे.
करणसिंग राजपूत, जिल्हा प्रदूषण नियंत्रण अधिकारी, जळगाव