---Advertisement---
दावोस येथे झालेल्या जागतिक गुंतवणूक परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आक्रमक आणि प्रभावी प्रयत्नांचे फळ म्हणून जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुका औद्योगिक नकाशावर झळकणार आहे. जागतिक स्तरावरील प्रसिद्ध शीतपेय कंपनी कोका-कोला ने जामनेरमध्ये भव्य औद्योगिक प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला असून, हा प्रकल्प तालुक्याच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी दावोस परिषदेत विविध आंतरराष्ट्रीय उद्योग समूहांच्या प्रमुखांशी संवाद साधत महाराष्ट्रातील उद्योगस्नेही धोरणे, मजबूत पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ आणि गुंतवणुकीसाठी उपलब्ध संधींचे प्रभावी सादरीकरण केले. याच दरम्यान त्यांनी कोका-कोला कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष मायकल गोल्डझमन यांची भेट घेऊन जामनेर प्रस्तावित प्रकल्पावर सविस्तर चर्चा करत अधिकृत शिक्कामोर्तब केले.
जामनेर बनेल औद्योगिक विकासाचे केंद्र
या नव्या गुंतवणुकीमुळे नाशिक विभागात एकूण ७ लाख ३० हजार १०० रुपयांची गुंतवणूक होणार असून, त्यातील एक महत्त्वाचा आणि चर्चेचा प्रकल्प जामनेरमध्ये साकारला जाणार आहे. त्यामुळे जामनेर तालुका राज्याच्या औद्योगिक विकासाच्या केंद्रस्थानी येणार आहे.
“ऐतिहासिक दिवस” – मंत्री गिरीश महाजन
कोका-कोला सारख्या जागतिक दर्जाच्या कंपनीचा प्रकल्प जामनेरमध्ये येणे ही तालुका आणि जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. यामुळे स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार असून हा जामनेरसाठी ऐतिहासिक दिवस असल्याचे मत मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले.
आर्थिक व सामाजिक विकासाला चालना
कोका-कोला प्रकल्पामुळे जामनेरच्या आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळणार आहे. वाहतूक, लॉजिस्टिक्स, पॅकेजिंग, सेवा उद्योग यांसारख्या पूरक क्षेत्रांना मोठी चालना मिळेल. तसेच रस्ते, वीज, पाणीपुरवठा, दळणवळण आणि इतर मूलभूत पायाभूत सुविधांचा वेगाने विकास होईल.
स्थानिक नागरिक, शेतकरी आणि लघुउद्योजकांना या प्रकल्पाचा मोठा फायदा होणार असून, जामनेर तालुक्यासाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे.









