---Advertisement---
आजकाल सोशल मीडियावर राजकीय पक्षांच्या डिजिटल वॉरपेक्षा एका वेगळ्याच पक्षाची जोरदार चर्चा सुरू आहे, त्या पक्षाचे नाव आहे ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP). अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या या उपरोधिक (Satirical) पक्षाने इंस्टाग्रामवर अशी काही धमाल उडवून दिली आहे की, देशातील बेरोजगार आणि तरुणांनी या हँडलला फॉलो करण्याचा सपाटा लावला आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, सुरू झाल्याच्या अवघ्या ६ दिवसांतच या पक्षाने इंस्टाग्रामवर १ कोटी ३६ लाखांपेक्षा (13.6 Million) जास्त फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला आहे. फॉलोअर्सच्या या शर्यतीत या डिजिटल पक्षाने देशातील बलाढ्य राजकीय पक्ष भाजप आणि काँग्रेसच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यांनाही मागे टाकले आहे.
इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्सची आकडेवारी:
पक्ष / हँडल इंस्टाग्राम फॉलोअर्स
कॉकरोच जनता पार्टी (@cockroachjantaparty) १ कोटी ३६ लाख+
काँग्रेस (@incindia) सुमारे १ कोटी ३३ लाख
भाजप (@bjp4india) सुमारे ८८ लाख
एका बाजूला भाजपच्या खात्यावर १८ हजारांहून अधिक पोस्ट आहेत, तर दुसरीकडे कॉकरोच जनता पार्टीने अवघ्या काही पोस्टमध्येच हा महाविक्रम केला आहे.
कशी झाली या ‘पक्षाची’ स्थापना? आणि उद्देश काय?
काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी एका सुनावणीदरम्यान बेरोजगार युवकांचा उल्लेख करताना कथितपणे ‘झुरळ’ (Cockroach) आणि ‘परजीवी’ (Parasites) या शब्दांचा वापर केला होता. या विधानानंतर सोशल मीडियावरील तरुण वर्गात तीव्र नाराजी पसरली.
तरुणांमधील हीच नाराजी ओळखून अभिजित दिपके नावाच्या एका ३० वर्षीय डिजिटल स्ट्रॅटेजिस्ट आणि युवकाने ‘कॉकरोच जनता पार्टी’ नावाने एक उपरोधिक (Satirical) इन्स्टा खाते सुरू केले. “जर व्यवस्था तरुणांना झुरळ समजत असेल, तर आम्ही ती ओळख स्वीकारून आमचा आवाज उठवू,” अशा उपरोधिक भूमिकेतून या मोहिमेची सुरुवात झाली. झेन-झेड (Gen-Z) आणि बेरोजगार तरुणांना ही संकल्पना प्रचंड आवडली आणि बघता बघता हे खाते तुफान व्हायरल झाले.
या अनोख्या आणि मिम्सवर आधारित डिजिटल आंदोलनाला राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा, माजी खासदार कीर्ती आझाद आणि आप नेते मनिष सिसोधिया यांनीही सोशल मीडियावर या हँडलला मजेशीर पाठिंबा दर्शवला आहे.
आपल्याला ‘Voice of the Lazy & Unemployed’ (आळशी आणि बेरोजगार तरुणांचा आवाज) म्हणवून घेणाऱ्या या पेजने आपला एक ५ कलमी जाहीरनामा (Manifesto) देखील प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये बेरोजगारी, शिक्षण आणि न्यायव्यवस्थेतील सुधारणांवर उपरोधिक भाष्य करण्यात आले आहे. सध्या या हँडलच्या यशाने देशभरातील सोशल मीडिया विश्लेषकांचे लक्ष वेधून घेतले आहे.









