---Advertisement---
नवी दिल्ली / मुझफ्फराबाद:
भारताला हादरवून सोडणाऱ्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा कथित मास्टरमाइंड आणि ‘अल-बद्र’ या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर हमजा बुरहान ऊर्फ अर्जुमंद गुलजार दार याचा खेळ अखेर खल्लास झाला आहे. पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील (PoK) मुझफ्फराबाद येथे अज्ञात बुरखाधारी बंदूकधाऱ्यांनी त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार करून त्याला जागीच ठार केले. या हल्ल्यात त्याचे शरीर गोळ्यांनी छिन्नविछिन्न झाले होते.
केंद्रीय गृह मंत्रालयाने २०२२ मध्ये हमजा बुरहानला अधिकृतपणे ‘दहशतवादी’ घोषित केले होते. त्याचा हा खात्मा पाकिस्तानमधील भारतविरोधी दहशतवादी नेटवर्कसाठी एक खूप मोठा धक्का मानला जात आहे.
वाहतूक कोंडीत गाठले आणि केला गोळीबार
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना मुझफ्फराबादमधील एआयएसएस (AISS) कॉलेजबाहेर घडली. हमजा बुरहानची गाडी एका वाहतूक कोंडीत (Traffic Jam) अडकली होती. याचाच फायदा घेत मोटारसायकलवरून आलेल्या बुरखाधारी हल्लेखोरांनी त्याच्या गाडीवर अचानक बेछूट गोळीबार सुरू केला. गोळ्यांचा वर्षाव इतका भीषण होता की हमजाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
शाळेचा प्रिन्सिपल बनून लपवला होता चेहरा
पाकिस्तानात आपली खरी ओळख लपवण्यासाठी हमजा एका शाळेचा प्रिन्सिपल (मुख्याध्यापक) म्हणून काम करत होता. त्याचे अनुयायी आणि साथीदार त्याला ‘डॉक्टर’ या टोपणनावाने ओळखत असत.
कोण होता हमजा बुरहान?
खरे नाव: अर्जुमंद गुलजार दार
मूळ रहिवासी: रत्नीपोरा, पुलवामा (जम्मू आणि काश्मीर)
पार्श्वभूमी: २०१७ मध्ये उच्च शिक्षण घेण्याचा बहाणा करून तो पाकिस्तानात पळून गेला होता. मात्र, तिथे गेल्यावर तो ‘अल-बद्र’ या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेत सामील झाला आणि अल्पावधीतच तिथला मुख्य कमांडर बनला.
सहकारी: तो काश्मीरमध्ये ठार झालेले कुख्यात दहशतवादी बुरहान वानी, झाकीर मुसा, अबू कासिम आणि अबू दुजाना यांचा अत्यंत जवळचा सहकारी होता.
काश्मीरमधील तरुणांचे करायचा ब्रेनवॉश
अल-बद्रचा कमांडर बनल्यानंतर हमजा पुन्हा काश्मीरमध्ये सक्रिय झाला होता. दक्षिण काश्मीरमधील तरुणांना भडकवून, त्यांचे ब्रेनवॉश करून (कट्टरपंथी बनवून) दहशतवादी संघटनांमध्ये भरती करण्याची मुख्य जबाबदारी त्याच्यावर होती. पुलवामा ते शोपियानपर्यंत त्याने आपले दहशतवादी जाळे घट्ट विणले होते.
पुलवामा हल्ला: देशाच्या इतिहासातील काळा दिवस
दिनांक १४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर सीआरपीएफच्या (CRPF) ताफ्यावर एक आत्मघाती हल्ला झाला होता. एका दहशतवाद्याने स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या बसवर धडकवली होती.
या भीषण हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले होते.
पाकिस्तानस्थित ‘जैश-ए-मोहम्मद’ने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती, तर हमजा बुरहान या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार (मास्टरमाइंड) असल्याचा आरोप होता.
या स्फोटाचा आवाज कित्येक मैल दूरपर्यंत ऐकू गेला होता आणि महामार्गावर मोठा खड्डा पडला होता.
या घृणास्पद हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असलेल्या हमजा बुरहानचा अखेर पाकिस्तानातच ‘अज्ञात’ हल्लेखोरांनी गेम ओव्हर केला आहे.









