---Advertisement---
यावल तालुक्यातील पंचायत समितीचा प्रशासकीय कारभार सध्या पूर्णतः रामभरोसे सुरू असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. गटविकास अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारासह संपूर्ण कार्यालयात बेशिस्तीचे वातावरण असून भ्रष्टाचार खुलेआम सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
लोकप्रतिनिधी नसल्याचा गैरफायदा घेत काही अधिकारी आणि कर्मचारी कुणालाही जुमानत नसून आर्थिक फायद्यासाठी सर्वसामान्य नागरिकांची पिळवणूक करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. घरकुल योजना, पंधरावा वित्त आयोग, रोजगार हमी योजना यांसारख्या थेट जनतेशी संबंधित योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
अर्थपूर्ण व्यवहार केल्याशिवाय कोणतेही काम होत नसल्याने शेतकरी, मजूर आणि गरीब नागरिक अडचणीत सापडले आहेत. विशेष म्हणजे खासदार, स्थानिक आमदार आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत दोन वेळा पंचायत समितीच्या सभागृहात जनसभा झाल्या. या जनसभांमध्ये ग्रामस्थांनी पुराव्यासह भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, मात्र तरीही प्रशासनावर कोणताही ठोस परिणाम झाल्याचे दिसत नाही. या कारभाराविरोधात उपोषणे, आंदोलने करूनही अधिकारी आणि कर्मचारी आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा करत नसल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. नियमांना डावलून सोयीस्कर कारभार सुरू असल्याचा आरोप होत आहे.
ग्रामपंचायतीकडे गेल्यावर पंचायत समितीकडे पाठवले जाते आणि पंचायत समितीत गेल्यावर पैशांची मागणी केली जाते, या दुष्टचक्रात सामान्य नागरिक भरडला जात आहे. यावल तालुक्यातील या गंभीर प्रश्नांकडे लोकप्रतिनिधी कधी लक्ष देणार? की भ्रष्ट अधिकाऱ्यांना अभय दिले जाणार? असा थेट सवाल आता ग्रामस्थांकडून केला जात आहे.









