Crime News: अमळनेर तालुक्यात शुल्लक कारणावरून दाम्पत्यास जबर मारहाण

जळगाव : जिल्ह्यात क्षुल्लक कारणांवरुन हाणामारी होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशाच प्रकारे अमळनेर तालुक्यात पातोंडा येथे शुल्लक कारणावरून मारहाण झाल्याची घटना घडली आहे.  रविवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास तिघांनी एकाला डोक्यात वीट मारून तर त्याच्या पत्नीलाही मारहाण केली. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शांताराम भालेराव पाटील (रा. पातोंडा ता. अमळनेर) हे  रविवार १२ रोजी सायंकाळी त्यांची रिक्षा संशयित मधुकर राजाराम पाटील यांच्या अंगणातून नेत होते. त्यावेळी मधुकर पाटील यांनी अंगणात टाकलेल्या मातीच्या वरमावरून गेल्याने मधुकर पाटील हे शिवीगाळ करू लागले. याप्रसंगी  संशयित सिंधुबाई राजाराम पाटील या देखील बाहेर आल्या. त्यांनीही  शांताराम पाटील यांना शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. शांताराम पाटील यांची पत्नी वर्षा भांडण सोडवायला गेली असता तिलाही मारहाण केली.

संशयित आरोपी भोलू मधुकर पाटील याने हातात वीट घेऊन शांताराम पाटील यांच्या डोक्यात मारली. त्यांच्या डोक्यातून रक्त येऊ लागले. उपचारासाठी त्यांना ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. दोन टाके टाकून धुळ्याला पाठवण्यात आले. दवाखान्यातून परत आल्यावर अमळनेर पोलीस स्टेशनला मधुकर पाटील, सिंधुबाई पाटील, भोलू पाटील यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल सुनील जाधव करीत आहेत.