---Advertisement---
जळगाव, प्रतिनिधी – जळगाव जिल्ह्यातील भुसावळ आणि खडका गाव परिसरात प्रेमविवाहाच्या रागातून एका 25 वर्षीय तरुणावर अमानुष मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चेतन दिलीप जंगले (वय 25) या तरुणाने घटस्फोटानंतर संबंधित तरुणीसोबत प्रेमविवाह केला होता. याच रागातून मुलीच्या नातेवाईकांनी चेतनला बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे तर त्याची नग्न धिंड काढत अमानुष छळ करण्यात आला.
यावेळी आरोपींनी त्याच्या गळ्याला रुमालाने आवळून त्याला ठार मारण्याचाही प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच संबंधित तरुणीला जबरदस्तीने पळवून नेण्यात आल्याचेही समजते.
घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.









