रावेर: रावेर पोलिसांनी सिनेस्टाइल्स पाठलाग करीत ६० हजार रुपये किंमतीच्या गोवंश जातीच्या जनावराचे ३०० किलो मांस व रिक्षासह सुमारे एक लाखांचा मुद्देमाल तालुक्यातील चोरवड चेक नाक्यावर जप्त केला. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली.
पाठलागाअंती ३०० किलो मांस जप्त
गोवंश जातीचे मांस घेऊन जात असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना मिळाली होती. या माहितीनंतर त्यांनी पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे यांच्या पथकाला कारवाईचे निर्देश दिले. पथकाने रसलपूर-केन्हाळे रस्त्यावर पाळत ठेवली. थोड्याच वेळाने रसलपूरकडून केहऱ्हाळेकडे भरधाव वेगाने एक रिक्षा येत असल्याचे दिसताच पथकाने रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र रिक्षा भरधाव वेगाने निघून गेली.
पोलीस पथकाने रिक्षाचा पाठलाग करून शुक्रवारी सकाळी आठ वाजता चोरवड नाक्यावर रिक्षा ताब्यात घेत तपासणी केली असता रिक्षात गोवंश जातीचे जनावरांचे ६० हजार रुपये किंमतीचे ३०० किलो मांस रिक्षाच्या सीटखाली आढळले. पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. रणजीत पाटील यांनी तपासणी करून हे मांस गोवंशी जातीच्या जनावरांचे असल्याचे सांगितले. दरम्यान, पोलिसांनी कारवाईत सातत्य राखावे, अशी अपेक्षा आहे.
दोन आरोपींना अटक
रावेर पोलिसांनी गो मांस वाहतूक करणारी ४५ हजार रुपये किंमतीची रिक्षा (क्रमांक एम.पी.६८ आर.०९३२) व ६० हजार रुपये किंमतीचे गोमांस मिळून एक लाख पाच हजारांचा मुद्देमाल जप्त केला. रिक्षा चालक अब्दूल मन्नान अन्सारी (रा.हमीदपूरा बऱ्हाणपूर) व मोहंमद ईलियास मोहंमद याकुब (बोरी मैदान, बऱ्हाणपूर) यांना पोलिसांनी अटक केली. याबाबत कॉन्स्टेबल संतोष गोंदगे यांनी रावेर पोलिसत दिलेल्या फिर्यादेवरून महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग, पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे, हवालदार सतीश सानप, सिकंदर तडवी, कॉन्स्टेबल योगेश पाटील, राहुल परदेशी आदींच्या पथकाने केली.