कासोदा : सामाजिक शांततेला अडसर ठरू पाहणार्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आडगाव येथील उपद्रवीस सहा महिन्यांकरिता जळगाव जिल्ह्यांतून हद्दपार करण्याची करवाई करण्यात आली आहे. दरम्यान, त्यास २० नोव्हेंबर रोजी विधानसभा मतदानासाठी दोन तासाची अनुमती देण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील कासोदा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आडगाव येथील भुषण रविंद्र पवार (३१) यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६(१) अ/ब नुसार हद्दपार करण्याबाबतचा प्रस्तावानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. हा प्रस्ताव उपविभागीय पोलिस अधिकारी भाग चाळीसगाव व कासोदा पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरिक्षक निलेश राजपूत यांनी उपविभागीय दंडधिकारी (प्रांताधिकारी) एरंडोल यांच्याकडे सादर केला होता. भूषण पवार विरोधात फौजदारी कायद्याने गुरन ०१/२०११,१०३/२०१९,१०६/२०२१,४८/२०२३ या चार गुन्ह्यांची विविध कलमांतर्गत नोंद आहे.
त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे त्याच्याकडून आगामी सण उत्सव व विधानसभा निवडणुकीच्या काळात अनुचित प्रकार घडण्याच्या शक्यता असल्याने व कायदा व सुव्यवस्थेस बाधा पोहोचण्याचा संभव असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये , तसेच शांतता भंग होऊ नये याकरिता भुषण रविंद्र पवार यास उपविभागीय दंडाधिकारी एरंडोल भाग एरंडोल मनिषकुमार गायकवाड यांना ६ नोव्हेंबरच्या आदेशान्वये महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६(१)(अ)(ब)अन्वये, आदेशाच्या जळगाव जिल्ह्यातून सहा महिने करिता हद्दपार करण्यात आलेले आहे.
परंतु भूषण पवार हा मुळ आडगाव येथील रहिवाशी असून तो मतदार असल्यामुळे त्यास २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या मतदानात दोन तासांसाठी मतदान करण्याची अनुमती देण्यात आली आहे.