Crime News : आव्हाणे येथे दोन गटात हाणामारी

जळगाव : तालुक्यातील एका गावांत किरकोळ कारणावरून दोन गटात वाद होऊन हाणामारी झाली. यात दोन्ही गटांनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुरुवार, २४ रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास आव्हाणे गावात बस स्टॅण्डजवळ चौकात दोन गटात वाद होऊन हाणामारीची घटना घडली. याप्रकरणी तक्रारीनुसार तालुका पोलीस ठाण्यात परस्परविरोधात गुन्हे शुक्रवार, २५ रोजी दाखल झालेत.

कैलास मंगल पाटील (वय ५३, रा. आव्हाणे) यांच्या तक्रारीनुसार त्यांचा पुतण्या मुरलीधर शांताराम पाटील, सोपान सुभाष पाटील यांचे सचिन घनश्याम पाटील यांच्याशी भांडण चालू होते. प्रदीप घनश्याम पाटील (रा.आव्हाणे) यांनी धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. त्याला समजावण्यासाठी गेले असता प्रदीप पाटील यांनी हातातील काहीतरी वस्तू कैलास पाटील यांना कानाजवळ मारून दुखापत केली.घनश्याम पाटील यांनी कैलास यांना शिवीगाळ करून दमदाटी केली.


दुसऱ्या गटाचे प्रदीप घनश्याम पाटील (वय २४, रा. आव्हाणे) यांच्या तक्रारीनुसार काही कारण नसताना सोपान सुभाष पाटील, मुरलीधर शांताराम पाटील, कांतीलाल भावलाल पाटील तसेच कैलास मंगल पाटील (रा. आव्हाणे) यांनी शिवीगाळ केली. सोपान पाटील यांनी लाकडी दांड्याने प्रदीप पाटील यांचे बंधू सचिन यांना उजव्या डोळ्याजवळ मारून दुखापत केली. मुरलीधर पाटील यांनी हातातील लोखंडी सळईने मारहाण केली. हे भांडण सोडविण्यासाठी प्रदीप पाटील गेले असता कांतीलाल पाटील यांनी हातातील लाकडी दांडक्याने कपाळाजवळ दुखापत केली. कैलास पाटील यांनी हॅड्रोलिक नळीने घनश्याम पाटील यांना हातावर दुखापत केली. तसेच धमकाविले.


दोन्ही गटाच्या तक्रारीनुसार परस्परविरोधात गुन्हा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास पो. हे. कॉ. अनिल फेगडे हे करीत आहेत.