Crime News : शहरात चोरट्यांनी साधली दिवाळी; साडेतीन लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

जळगाव : बंद घराला लक्ष्य करून मुद्देमाल चोरून नेण्याचा शहरात सिलसिला सुरूच आहे. वरच्या मजल्यावरील वकिलाच्या घराचा बंद दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी सुमारे ३ लाख, ६३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. शहरातील साखरवाडी, महाबळ परिसरात त्र्यंबकनगर येथे ही घरफोडी २२ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबरदरम्यान घडली.

दीपक सखाराम खादीलकर (वय ५६, रा. प्लॉट नं. ८६, रा. त्र्यंबकनगर) हे वास्तव्य करतात. घराच्या वरच्या मजल्यावरील मुख्य दरवाजा बंद होता. ही संधी साधत चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून घरात एण्ट्री केली. लोखंडी कपाटातील सामान अस्ताव्यस्त केला. लॉकरचे कुलूप तोडले. त्यातील सोन्याचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले. त्यांच्या कार्यालयाच्या रूममधील लाकडी कपाटातील ठेवलेली ३० हजारांच्या रोकडवरही चोरट्यांनी हात मारला.

४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मणीमंगळसूत्र ४.५ तोळे वजनाचे, १० हजारांचे सोन्याचे मणीमंगळसूत्र १ तोळे वजनाचे, २० हजार किमतीच्या सोन्याच्या पाटल्या, दोन तोळे वजनाच्या ४० हजार किमतीच्या सोन्याच्या बांगड्या, चार तोळे वजनाचे, ४० हजार किमतीचे सोन्याचे कंगण, चार तोळे वजनाचा, ४० हजारांचा सोन्याचा नेकलेस चार तोळे वजनाचे, तीन हजार किमतीचे सोन्याचे कानातले टॉप्स, तीन ग्रॅम वजनाची, चार हजारांची सोन्याची नथ, चार ग्रॅम वजनाचा, २० हजार किमतीचा सोन्याचा चपलाहार, दोन तोळे वजन, ४० हजारांची प्रत्येकी एक तोळा वजनाची एकूण चार तोळे वजन, ३३ हजार रुपयांची सोन्याची चिप प्रत्येकी एक तोळा वजन एकूण ३३ ग्रॅम वजनाचे, १२ हजारांच्या सोन्याच्या अंगठ्या प्रत्येकी चार ग्रॅम वजनाच्या, एकूण १२ ग्रॅम वजन. १२ हजारांच्या सोन्याच्या ३ अंगठ्या प्रत्येकी चार ग्रॅम वजन, एकूण १२ ग्रॅम. १० हजारांचे सोन्याचे एक ब्रेसलेट एक तोळे वजन, ३० हजारांची रोकड असा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. या प्रकरणी बुधवार, ३० रोजी तक्रारीनुसार रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी भेट दिली. परिसरातून सीसीटीव्हीचा शोध घेत फुटेज प्राप्त करण्याच्या तपासाला पोलिसांनी गती दिली आहे. तपास सपोनि विठ्ठल पाटील हे करीत आहेत.

पंचवटीनगरातून ६३ हजारांचा मुद्देमाल लंपास

शहरातील पंचवटी नगरात मुख्य दरवाजाचे लॉक तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर लोखंडी कपाटाचे लॉक तोडले. सुमारे ६३ हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. आव्हाणे शिवारातील पंचवटीनगरात ही घटना सोमवारी, २८ रोजी दुपारी चार ते संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान घडली. या प्रकरणी बुधवार, ३० रोजी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. गिरीजा शंकर नन्नवरे (वय ३२, रा. प्लॉट नं. ४८ पंचवटीनगर) येथे कुटुंबासह राहतात. त्यांचे घर बंद आहे हे हेरत चोरट्यांनी घरात प्रवेश केला. बेडरुममधील लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून त्यातून मुद्देमाल चोरुन नेला. १२ हजार किमतीची चार ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, १५ हजार किमतीची पाच ग्रॅम वजनाची सोन्याची एक अंगठी. नऊ हजारांची तीन ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, १८ हजारांचे सहा गॅम वजनाचे सोन्याचे कानातले टोंगल, नऊ हजारांचे तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे लॉकेट असा मुद्देमाल चोरट्यांनी नेला. तपास पो. हे. कॉ. संजय भालेराव हे करीत आहेत.