Jalgaon News: रील स्टार असलेल्या मुलाकडून पित्याचा होणारा अनन्वीत छळ व दारू पिवून होणाऱ्या मारहाणीला कंटाळून संतप्त माजी सैनिक असलेल्या पित्याने मुलाचा दोरीने गळा आवळत खून केला व स्वतःदेखील सुसाईड नोट लिहित जगाचा निरोप घेतला. मन सुन्न करणारी ही धक्कादायक घटना एरंडोल तालुक्यात गुरुवार, 27 रोजी घडली. विकी उर्फ हितेश विठ्ठल पाटील (22, रा.भोरखेडा, ता.धरणगाव, हल्ली मुक्काम एरंडोल) असे खून झालेल्या तरुणाचे तर विठ्ठल पाटील (एरंडोल) असे आत्महत्या केलेल्या पित्याचे नाव आहे.
रील स्टार मुलाचा छळ असह्य
खास पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, रील स्टार असलेल्या विकी उर्फ हितेश याचे एरंडोल तालुक्यात लाखो फालोअर्स आहेत मात्र कौटुंबिक कारणामुळे तो माजी सैनिक असलेल्या वडील विठ्ठल पाटील यांच्यापसून विभक्त राहत होता व या ना त्या कारणातून तो माजी सैनिक असलेल्या वडिलांचा छळ करून मारहाण करीत होता. या प्रकाराला कंटाळून मंगळवार, 25 रोजी विठ्ठल पाटील यांनी गळफास घेत आत्महत्या केली.
चिठ्ठीतून दिली मुलाच्या खुनाची कबुली
आत्महत्या करण्यापूर्वी विठ्ठल पाटील यांच्या खिशात सुसाईड नोट आढळली होती. त्यात मुलगा हितेश हा दारू पिवून सातत्याने मारहाण करीत होता व त्यास कंटाळून आपण त्याचा भोरखेडा गावाजवळील एका नाल्याजवळ खून करीत मृतदेह पुरल्याचा उल्लेख होता. बुधवारी विठ्ठल पाटील यांच्या आत्महत्येचा उलखडा झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला दिशा दिली व गुरुवारी मयत तरुणाचा मृतदेह आढळल्याने तो शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला. घटनास्थळी सुती दोरी आढळली असून त्याद्वारे तरुणाला फाशी दिली असावी, असा संशय आहे. शवविच्छेदन अहवालातून नेमकी बाब स्पष्ट होईल, असे अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर म्हणाल्या.
अधिकाऱ्यांची धाव
जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, एरंडोल निरीक्षक निलेश गाकवाड, धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवनकुमार देसले व पथकाने धाव घेतली. एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.