भुसावळ/शिरपूर : शिरपूर तालुका पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे एक वाहनातून तब्बल पाच लाख ६० हजारांचा गुटखा जप्त केल्याने गुटखा तस्कर हादरले आहेत. निवडणूक काळात प्रशासनाकडून सातत्याने कारवायांचा धडाका सुरू असल्याने तस्करांच्या गोटात प्रचंड भीती पसरली आहे. ही कारवाई हाडाखेड सीमा तपासणी नाक्यावर शुक्रवारी मध्यरात्री करण्यात आली. अन्वर शरीफ खान (२४, रा. बेडोज, ता. रामगड, जि. अलवर, राजस्थान) असे अटकेतील ट्रकचालकाचे नाव आहे.
शिरपूर तालुका पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना ट्रकमधून गुटखा येत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला निर्दे श दिले. हाडाखेड सीमा तपासणी नाक्यावर ट्रक (आरजे १४ जीएन ४४२२) आल्यानंतर त्याची तपासणी केली. त्यात सुगंधीत अवैध तंबाखूचा साठा आढळून आला. पाच लाख ६० हजार रुपये किमतीची सुंगधीत तंबाखू आणि १० लाखांचा ट्रक असा एकूण १५ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अन्वर शरीफ खान (२४, रा. बेडोज, ता. रामगड, जि. अलवर, राजस्थान) या ट्रकचालकाला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका
पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पवार, जयराज शिंदे, संतोष पाटील, संदीप ठाकरे, राजू डिसले, योगेश मोरे, संजय भोई, स्वप्नील बांगर, जयेश मोरे, सुनील पवार, मनोज नेरकर, भूषण पाटील, चालक अलताफ मिर्झा आदींच्या पथकाने केली.