Crime News : सेवानिवृत्त शिक्षकाच्या हातातली पैशांची पिशवी हिसकावून चोरट्यांचा पोबारा; पाठलाग करताना मुलगा जखमी

तळोदा : येथील स्टेट बँक शाखेतून 9 लाखाची रक्कम घेऊन बाहेर आलेल्या सेवानिवृत्त शिक्षकाच्या हातातून पिशवी हिसकावून 2 चोरट्यानी पळ काढल्याची घटना घडली आहे घटनेत चोरट्यांचा पाठलाग करणारा शिक्षकांच्या मुलाचा अपघात होऊन तो जबर जखमी झाला आहे दिवसाढवळ्या भर गर्दीच्या ठिकाणी घडलेल्या चोरीच्या घटनेने तळोदा शहरात खळबळ माजली असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तळोदा तालुक्यातील तळवे येथील रहिवासी सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक देविदास मंगा मराठे हे मागील 30 सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांची सेवानिवृत्ती ची रक्कम भारतीय स्टेट बँक शाखा तळोदा येथे जमा झाली आहे. ही जमा रक्कम काढण्यासाठी देविदास मराठे हे आज त्यांचा मुलगा संकेत मराठे याच्या सोबत बँकेत आले व त्यांनी दुपारी सव्वा दोन वाजता 9 लाख रोख रक्कम काढली व कापडी पिशवीत ठेवून बाहेर आले. त्यांच्या मुलगा संकेत याच्या मोटरसायकलवर पिशवी घेऊन बसत असताना आधीच त्यांच्यावर बँकेत पाळत ठेवून असलेल्या दोन जणांनी मागून मोटरसायकलवर येत देविदास मराठे यांच्या हातातून पिशवी हिसकावली व पळ काढला. ही बाब मोटरसायकलवर बसलेला देविदास मराठे यांचा मुलगा संकेत याच्या लक्षात येताच त्याने तसाच त्यांच्या पाठलाग सुरू केला. आधी चोरटे बँकेच्या आवारातून चिनोदा रोडकडे गेले व तेथून बिरसा मुंडा चौक मार्गे शहादा रस्त्याने भरधाव वेगाने जात असतांना त्यांच्या मागे असलेल्या संकेत याच्या शहादा रस्त्यावरील जैन शॉपी समोर खड्डा व त्यातील वाळूमुळे मोटरसायकल घसरून अपघात झाला त्यात तो जबर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारार्थ नंदुरबार येथे हलविण्यात आले आहे.


त्यानंतर पोलिसांना घटनेची खबर दिली असता सपोनि राजू लोखंडे व पोउनि महेंद्र पवार हे पोलिसांसह घटनास्थळी पोहोचले व त्यांनी बँकेचे सीसीटीव्ही फुटेज तपासून पुढील कारवाईकरीत आहेत. घटनास्थळी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरक्षक किरण खेडकर यांनी सुद्धा भेट देऊन तपासाबाबत कारवाई हाती घेतली आहे. 1 महिन्यापूर्वी कॉलेज रोडवरील मिनी बँकेतून 4 लाख रु रक्कम असलेली बॅग लंपास झाली होती. आजतागयत त्याच्या तपास लावण्यात तळोदा पोलिसांना यश आलेले नाही.