---Advertisement---
Crime News : अवैधरीत्या दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनांना लक्ष्य करून शस्त्राचा धाक दाखवून मुद्देमाल जबरीने लुटला जात होता. रस्तालूट करणाऱ्या टोळीतील फरार दोघांच्या मालेगावातील सयाने या गावातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या. उमेदसिंग ऊर्फ उमेद ऊर्फ उमद्या गोविंदसिंग पाडवी व लक्ष्मण ऊर्फ लक्षा विक्रम सिंग वसावे अशी अटक केलेल्या साथीदारांची नावे आहेत.
अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनांना अडवून शस्त्राच्या बळावर दारू जबरीने दरोडेखोर लुटत होते. या टोळीतील काही संशयितांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र, फरार दोघे पोलिसांना चकमा देत होते. फरार चौघे मालेगावातील सयाने गावात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी तत्काळ पथक तपासार्थ रवाना केले.
आधी घेतले चौघांना ताब्यात
रस्तालुटीच्या गुन्ह्यात पथकाने यापूर्वी राज्या ऊर्फ नागेश ऊर्फ नाकक्षा दमण्या वळवी, नीरजा ऊर्फ निजा पोहत्या वसावे, भटेसिंग राण्या पावरा, बुधा ऊर्फ बुध्या कमा जांगड्या (सर्व रा. धडगाव, जि. नंदुरबार) यांना अटक केली होती. या संशयितांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे दोन्ही फरार साथीदारांपर्यंत पथक पोहोचले.
पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक मुकेश पवार, हवालदार सजन वाघ, रमेश साळुंखे, पोलीस नाईक जितेंद्र तोरवणे, पोलीस शिपाई यशोदीप ओगले, रामेश्वर चव्हाण, भरत उगले यांच्या पथकाने ही कामगिरी केली.