Crime News: चाळीसगावमध्ये हवेत गोळीबार करणारे सीसीटीव्हीमध्ये कैद, एकास अटक इतरांचा शोध सुरु

जळगाव :  जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात बुधवार, 8 रोजी मध्यरात्री गोळीबार करत दहशत निर्माण केल्याचा प्रकार  उघड झाला आहे. शहरातील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल जवळ एका अज्ञात व्यक्तीने हवेत गोळीबार करत दगडफेक केली. यामुळे या संपूर्ण परिसरात दहशत निर्माण झाले आहे. या घटनेबाबत चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, मंगळवार, ७ रोजी रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास सारंग अशोक बेलदार यांच्या घरासमोर तीन दुचाकींवर सहा जण आले होते.  या सर्वानी तोंडाला रूमाल बांधले होते. यातील बुलेट मोटारसायकलवर मागे बसलेल्या व्यक्तीने हवेत गोळीबार केला, तसेच सारंग बेलदार यांच्या घराच्या पोर्चमध्ये उभ्या असलेल्या दुचाकीवर दगडफेक करून नुकसान केले. यासोबतच पोर्च बाहेर काचेची बाटली फोडून शिवीगाळ करत ते दुचाकीवरून फरार झाले. या गोळीबाराचा संबंध जुन्या वादाशी असल्याचे बोलले जात आहे.

या घटनेनंतर, फरार होतांना संशयित आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत. घटना घडताच  चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी व अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांनी संशयित आरोपी संकेत उर्फ बाळू मोरे (रा. हनुमान वाडी, चाळीसगाव) याच्या घराची झडती घेतली. या झडतीत पोलिसांना त्याच्या घरातून पिस्टल मॅगझीन, सहा जिवंत काडतूस, कोयता, स्टील रॉड गुप्ती आणि बेसबॉल खेळण्याची लाकडी बॅट यांसारखी घातक हत्यारे जप्त करण्यात आली.

चाळीसगाव शहरातील या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे.