---Advertisement---
जळगाव : शाळा, महाविद्यालय व सार्वजनिक ठिकणी तरुणी व महिलांना टारगटांचा त्रास कमी करण्यासाठी दामिनी पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. यानुसार प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये हे पथक कार्यरत करण्यात आले आहे. या पथकांकडून शाळा-महाविद्यलयाच्या सुटण्याच्या वेळेत गस्त घातली जात आहे. या गस्ती पथकाने एकाच दिवसांत तब्बल २१ रोडरोमियोंवर प्रतिबंधात्मक कारवाई करीत त्यांना ताब्यात घेतले. यानंतर या रोडरोमिओंसह यांच्या पालकांना बोलविण्यात आले. यावेळी दोघांना समज देऊन सोडण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात रोडरोमिओंकडून विद्यार्थीनीची छेड काढण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाली होती. ही बाब लक्षात घेत पोलीस अधीक्षकांनी या रोडरोमिओंवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यात दोन पुरुष व एक महिला अंमलदार अशा १२ पुरुष तर ६ महिला अंमलदारांची या दामिनी पथकात नियुक्ती करण्यात आली आहे. हे पथक शाळा महाविद्यालयाच्या परिसरात गस्त घालणार असून, रोडरोमिओंवर तात्काळ कारवाई करणार आहेत.
---Advertisement---
दामिनी पथकाकडून रवाईच्या पहिल्याच दिवशी शहरातील मेहरुण तलाव परिसरात असलेल्या सेंट टेरेसा स्कुल, नूतन मराठा महाविद्यालय, एम. जे. कॉलेज, बेंडाळे कॉलेज, का. ऊ. कोल्हे विद्यालय, खुबचंद सागरमल विद्यालय याठिकाणी विनाकारण शाळेच्या बाहेर थांबून विद्यार्थीनींना बघून अश्लिल चाळे करणाऱ्या २१ टवाळखोरांवर पथकाकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तर २५ जणांना समज देवून सोडून देण्यात आले.
सेंट जोसेफ हायस्कुल समोर स्वर्गीय मीनाताई ठाकरे मार्केटमध्ये रोडरोमिओंवर रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. याठिकाणाहून १४ जणांना ताब्यात घेण्यात आले तर जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली समाधान पाटील, राहूल पाटील, अमित मराठे, प्रशांत सैंदाणे यांच्या पथकाने बुधवारी दुपारी नूतन मराठा महाविद्यालयाच्या परिसरात फिरणाऱ्या पाच रोडरोमिओंवर कारवाई केली.
कारवाई करण्यात आलेल्या रोडरोमिओंच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलविण्यात आले. त्यानंतर या मुलांसह त्यांच्या पालकांना समज देवून त्यांना सोडून देण्यात आले. मात्र यापुढेही ही मोहीम सुरु राहणार असल्याचे असल्याचेही यावेळी पोलिसांकडून सांगण्यात आले.