तळोदा : येथील एकात्मीक आदिवासी प्रकल्पार्गत चालविण्यात येणा-या अलिविहीर येथील शासकीय आश्रम शाळेतील इयत्ता तिसरीतील आठ वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूने शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह ऐरणीवर आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आश्रमशाळेत सकाळी ६ वाजता प्रार्थना होत असते. मंगळवार, २६ रोजी या प्रार्थनेसाठी इयत्ता तिसरीतील तमन्ना बाज्या वसावे (वय ८वर्ष रा. उमरागव्हाण ता अक्कलकुवा) ही आली नाही. यामुळे तिला पाहण्यासाठी स्वयंपाकी रिजवान प्रताप वसावे याला वस्तीगृहात पाठवले असता. यावेळी त्याला तमन्ना ही पलंगावर झोपलेली आणि कुठलीही हालचाल करताना दिसली नाही. यावर तिला तात्काळ खाजगी वाहानाने तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टर ओमकार वळवी यांनी तपासणी केल्यानंतर सकाळी ८.४५ वाजता तिला मृत घोषित केले.
दरम्यान, तमन्नाच्या मृत्यूची माहिती तळोदा पोलीस ठाण्यात माध्यमिक शिक्षक अनिता विठ्ठलराव शेळके यांनी दिली. पोलीस निरीक्षक राजू लोखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी धमेंद्र पवार अधिक तपास करीत आहेत. या घटनेमुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंबंधी शंका आणि चिंता व्यक्त केली जात असून त्यांची सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.