---Advertisement---
Maharashtra Kesari 2026: Defeated Mahendra Gaikwad in the final; Harshvardhan Sadgir became ‘Double Maharashtra Kesari’…..!
महाराष्ट्रातील कुस्तीविश्वासाठी मोठी बातमी समोर आली आहे. नाशिकचा हर्षवर्धन सदगीर याने 68व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत दमदार कामगिरी करत मानाची गदा पटकावली आहे. पुण्यातील वाघोली येथे झालेल्या अंतिम सामन्यात हर्षवर्धनने सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याचा पराभव करत दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी किताब आपल्या नावावर केला आहे. या अंतिम सामन्यात हर्षवर्धन सदगीर याने महेंद्र गायकवाडवर 4-2 अशा फरकाने विजय मिळवला. विशेष म्हणजे, हर्षवर्धन हा आता दोन वेळा महाराष्ट्र केसरी किताब जिंकणारा सातवा कुस्तीपटू ठरला आहे. तर महेंद्र गायकवाड याचं यंदाही महाराष्ट्र केसरी होण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं.
या सामन्याची खास गोष्ट म्हणजे दोन्हीही कुस्तीपटू हे एकाच गुरूचे, काकासाहेब पवार यांचे शिष्य आहेत. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. गादी कुस्ती प्रकारात झालेल्या या अंतिम सामन्यात जवळपास 11 ते 13 मिनिटं जोरदार थरार पाहायला मिळाला.
सामन्याच्या पहिल्या फेरीत महेंद्र गायकवाडने आक्रमक सुरुवात करत पहिला गुण मिळवला. त्यानंतर त्याने आघाडी वाढवण्याचा प्रयत्न केला, मात्र हर्षवर्धनने चतुराईने त्याचा डाव उलटवत स्वतःही 1 गुण मिळवला. त्यामुळे पहिली फेरी 1-1 अशा बरोबरीत संपली.
यानंतर दुसऱ्या फेरीत हर्षवर्धनने आपल्या अनुभव आणि डावपेचांच्या जोरावर सामना आपल्या बाजूला झुकवला. शेवटी 4-2 अशा फरकाने विजय मिळवत त्याने पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरी गदेवर आपली मोहोर उमटवली.
हर्षवर्धनचा विजय होताच मैदानात एकच जल्लोष पाहायला मिळाला. त्याच्या चाहत्यांनी मॅटवर धाव घेत त्याला खांद्यावर उचलून घेतलं आणि विजयाचा आनंद साजरा केला. या विजयानंतर हर्षवर्धन सदगीर याला मानाची चांदीची गदा देऊन सन्मानित करण्यात आलं. याशिवाय त्याला 5 लाख रुपयांचा धनादेश आणि फॉर्च्युनर कार देण्यात आली. तर उपविजेता महेंद्र गायकवाड याला 4 लाख रुपयांचा धनादेश आणि स्कॉर्पिओ गाडी देऊन गौरवण्यात आलं.
स्पर्धेतील इतर विजेत्यांनाही मोठ्या प्रमाणात बक्षिसं देण्यात आली. माती आणि गादी विभागातील विविध गटांतील सुवर्णपदक विजेत्यांना एकूण 18 बुलेट मोटारसायकली देण्यात आल्या, तर रौप्यपदक विजेत्यांना स्प्लेंडर बाईक देण्यात आल्या.
दरम्यान, हर्षवर्धनच्या या यशानंतर त्याचे वडील मुकेश सदगीर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, “कुस्ती हा खेळ आहे, कुणाला तरी पराभव स्वीकारावा लागतो. दोघेही एकाच तालमीतले आहेत. हर्षवर्धनचं डबल केसरी होण्याचं स्वप्न पूर्ण झालं असून आता तो ट्रिपल केसरी होण्यासाठी तयारी करणार आहे.”
हर्षवर्धनच्या या शानदार कामगिरीमुळे नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.









