---Advertisement---
अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस अधिकच गाजत असून या प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणाचा तपास सध्या विशेष तपास पथक (SIT) करत असून खरातच्या मोबाईल आणि संगणकातून महत्त्वाचा डेटा बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते आणि आमदार विजय वड्डेटीवार यांनी मोठा दावा करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी म्हटले की, या प्रकरणात 1000 पेक्षा अधिक व्हिडिओ असल्याचे समोर आले आहे, मात्र आतापर्यंत केवळ 150 व्हिडिओच सार्वजनिक झाले आहेत. त्यामुळे उर्वरित व्हिडिओ कुठे आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच त्यांनी वादग्रस्त विधान करत पीडित महिलांच्या पतींवरही कारवाई करण्याची मागणी केली. “जे आपल्या कुटुंबासह तिथे गेले, तेही दोषी ठरतात,” असे ते म्हणाले.
वड्डेटीवार यांनी पुढे आरोप केला की, अशोक खरात हा अनेक वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय नेत्यांच्या संपर्कात होता. या प्रकरणात अनेक आमदार आणि मंत्र्यांची नावे समोर येत असल्याची चर्चा असून सर्वांची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, या प्रकरणामुळे राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले असून तपासातून आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.









