---Advertisement---
जळगाव : तालुक्यातील चिंचोली येथे उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय इमारतीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी ना. पवार यांनी चिंचोलीचे मेडिकल हब हे जळगावसाठीच नव्हे तर खान्देशच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावेल अशी आशा व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव दौऱ्यावर रविवारी दि. १७ ऑगस्ट रोजी आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे, खा. स्मिता वाघ, माजी मंत्री आ.अनिल पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर, उपअधिष्ठाता डॉ.मारुती पोटे, डॉ. धर्मेंद्र पाटील, प्रशासकीय अधिकारी डॉ. जितेंद्र सुरवाडे व संजय चौधरी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार यांना अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची प्रतिकृतीद्वारे पूर्ण प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. ना. अजित पवार यांनी प्रकल्पाचे कौतुक केले. प्रकल्प लवकर पूर्णत्वास आणून वैद्यकीय महाविद्यालय पुढील काळात स्थलांतरित होईल अशी आशा व्यक्त केली. यानंतर त्यांनी महाविद्यालयातील विविध विभागांच्या रचना प्रत्यक्ष पाहणी करून समजून घेतल्या. तर एका चित्रफितीद्वारे संपूर्ण मेडिकल हबची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिली.
सदर मेडिकल हबची हि वास्तू निर्माणाधीन असल्याने काही ठिकाणी ‘फिनिशिंग’बाकी आहे. ते काम दर्जात्मक व चांगल्या पद्धतीने करावे, अशा सूचना प्रकल्प विकासक कंपनी एचएससीसी व न्याती कन्स्ट्रक्शन यांना उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या.
ना. गिरीश महाजन म्हणाले की, जिल्ह्यातील आरोग्य विकासासाठी मेडिकल हबचे पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरताना पाहून मनस्वी आनंद होत आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेले कौतुक पाहून नक्कीच विकासकामांबाबत समाधान लाभत असल्याचेही ते म्हणाले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील विविध विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी यांचेसह मेडिकल हबचा प्रकल्प तयार करीत असलेले एचएससीसी कंपनीचे महाप्रबंधक बी. एस. कांबळे, उपमहाप्रबंधक एस. के. जैन, न्याती कन्स्ट्रक्शनचे मॅनेजिंग डायरेक्टर जगदीश ओटी, अधीक्षक अभियंता शिवाजी पिंगळे, गणेश घोले, वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक अख्तर दफेदार आदी उपस्थित होते.