---Advertisement---
---Advertisement---
जळगाव : वकिली क्षेत्रात काम करीत असताना मी कायम क्रॉस बॉर्डर टेरेरीझम हा शब्द वापरत आलो आहे. आपला जळगाव जिल्हा हा पॉलिटीकल टेरेरीझम म्हणून बाहेर परिचित आहे. मात्र, आपल्या जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात मतभेद असले तरी मनाची राजकीय श्रीमंती असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती नियुक्त खासदार अॅड. उज्ज्वल निकम यांनी केले.
शहरातील पद्मश्री अॅड. उज्ज्वल निकम नागरी सत्कार समितीतर्फे रविवारी (२७ जुलै) सायंकाळी छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात नागरी सत्कार सोहळा पार पडला, त्या वेळी नागरी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. एन. के. ठाकरे अध्यक्षस्थानी होते.

व्यासपीठावर नागरी सत्कार समितीचे अध्यक्ष अशोक जैन, ज्योती निकम, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, पणनमंत्री जयकुमार रावल, वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, आमदार सत्यजित तांबे, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार किशोर पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार अमोल जावळे, आमदार अमोल पाटील, मार्केटिंग फेडरेशनचे चेअरमन रोहित निकम, शैलजा निकम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, महापालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज आणि (स्व.) देवराम निकम व विमला निकम यांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पार्पण करण्यात आले. पद्मश्री अॅड. उज्ज्वल निकम नागरी सत्कार समितीतर्फे माजी कुलगुरू डॉ. एन .के. ठाकरे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपती नियुक्त खासदार अॅड. उज्ज्वल निकम यांचा स्मृतिचिन्ह आणि मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. नागरी सत्कार समितीचे अध्यक्ष तथा जैन उद्योगसमूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी प्रास्ताविक केले. रंगकर्मी शंभू पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सोनाली महाजन यांनी आभार मानले.
देशभरात नावाजलो तरी जळगावची कास कायम
नागरी सत्काराला उत्तर देतांना खासदार अॅड. उज्ज्वल निकम यांनी सांगितले की, १९८७ ते १९९३ या काळात सरकारी वकील म्हणून काम केले. अनेक सरकारे आली आणि गेली पण मी कायम राहिलो. खटले लढविण्यासाठी मुंबईसह अन्य ठिकाणी गेलो तरी जळगावची कास मी कायम ठेवल्याचे ते म्हणाले. माझी आई विमला निकम हिने माझ्यात देशभक्तीची मानसिकता तयार केली. तसेच पत्नी सौ. ज्योती निकम यांच्यामुळे मुंबई बॉम्बस्फोट खटला यशस्वीपणे लढू शकलो. या सर्व यशाचे श्रेय आई-वडील आणि पत्नीला असल्याचे त्यांनी सांगितले.
राजकारणात आलो अन् देशद्रोहाचा आरोप झाला
खासदार अॅड. निकम यांनी सांगितले की, निवडणूक लढविण्याची माझी इच्छा नव्हती. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आग्रह होता. मला प्रचारासाठी अवघे दहा दिवस मिळाले आणि मी निवडणूक हरलो. मी ज्यावेळी राजकारणात आलो, तेव्हा माझ्यावर देशद्रोहाचा आरोप झाला. पण मी व्यथित झालो नाही. माझ्या पराभवाने काहींना आनंदही झाला, पण मी विझलो नाही. मी नव्या ताकदीने उभा राहिलो असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात वाईट काय ?
लोकसभेची निवडणूक लढवितांना पत्रकारांनी मला प्रश्न विचारला, की तुम्ही संघाचे आहात का? आता संघाचा आणि माझा काही संबंध नाही, मी कधी शाखेत गेलो नाही, तरी प्रश्न माझ्यासमोर आला. मग मी पत्रकाराला म्हटलं संघात वाईट काय ते सांगा? या प्रश्नावर मात्र पत्रकार निरूत्तर झाल्याचे खासदार अॅड. निकम म्हणाले. देशाच्या एकतेचा विचार करतांना आपल्याला काय साध्य करायचे याचाही विचार होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे आवाहन त्यांनी केले.
आता दुहेरी भूमिका निभावणार
माझा पेशा वकीलीचा आहे. आता राज्यसभेचा सदस्य झालो आहे. त्यामुळे आता मी दुहेरी भूमिका निभावणार असल्याचे अॅड. निकम यांनी सांगितले. तसेच शपथ घेतल्यानंतर पहिली भेट देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची घेतली. पहिल्याच भेटीत अमित शहा म्हणाले, ट्रेन ब्लास्टचा खटल्यात आरोपी सुटले कसे? हा खटला जरी मी लढविला नसलो तरी एखाद्या मोठ्या नेत्याचे किती बारीक लक्ष असते हे कळते. असे त्यांनी सांगितले.
अॅड. निकमांमुळे मी मंत्री झालो- पालकमंत्री
२०१४ मध्ये युती सरकार स्थापन झाल्यानंतर जिल्ह्यातून मंत्रीपदासाठी माझा नंबर लागला नव्हता. मंत्री गिरीशभाऊंही वशिला लावत नव्हते. म्हणून मग मी बॉम्बब्लास्टकडे अर्थात अॅड. निकम यांच्याकडे गेलो. त्यांनी उध्दव ठाकरेंना फोन केला आणि मी २०१६ मध्ये राज्यमंत्री झालो असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. आता दिल्लीच्या तख्तावरही अॅड. निकम यांचे नाव उज्ज्वल व्हावे असे त्यांनी सांगितले.
लोकांना जवळ घ्यावे लागेल मंत्री महाजन
भारतीय जनता पार्टी हा जोहरींचा पक्ष आहे. त्याला हिऱ्याची पारख आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या मनात काही तरी आले असेल म्हणूनच जळगाव जिल्ह्यातून अॅड. उज्ज्वल निकम हे राष्ट्रपती नियुक्त खासदार झाले. दहशतवाद्यांचा कर्दनकाळ म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची ओळख राहिली आहे. आता राज्यसभेचे खासदार झाले आहेत. त्यामुळे आता तुम्हाला बदलावे लागेल. लोकांना जवळ घ्यावे लागेल, त्यांचे प्रश्न ऐकावे लागतील. तुम्हाला विचार करूनच राज्यसभेत घेण्यात आले असून तुम्ही संधीचे सोने कराल असे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
अॅड. निकम पदालाही न्याय देणार मंत्री रावल
खासदार अॅड. उज्ज्वल निकम हे जरी जळगावचे सुपुत्र असले तरी ते खान्देशातील आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. देशभरातच नव्हे तर जगात अॅड. निकम यांचे नाव आहे. एक कडवा देशभक्त त्यांच्यात असून ते सतत न्यायाच्या बाजूने उभे राहिले आहे. त्यामुळे ते राज्यसभेतील पदालाही न्याय देतील, असा विश्वास पणनमंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला.
बुद्धीच्या निकषावरच अॅड. निकम यांची निवड एन. के. ठाकरे
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ स्थापनेपासून अॅड. उज्ज्वल निकम यांच्याशी माझा संबंध आला. कोर्टाच्या त्रासापासून वाचविणारे निकमच आहेत. दीडकी खर्च न करता, कुठलाही घाम न गाळता अॅड. निकम खासदार झाले. मात्र त्यांची निवड ही बुध्दिच्या निकषावरच झाल्याचे माजी कुलगुरू तथा सोहळ्याचे अध्यक्ष एन. के. ठाकरे यांनी सांगितले.