धुळे : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी पोलीस यंत्रणेला दिले आहेत. याअनुषंगाने पोलीस दलातर्फे जिल्ह्यात विविध ठिकाणी कारवाई करण्यात येते आहे. अशातच पिमळनेर पोलिसांनी मांजरी ते नकट्या हनुमंत चेक पोस्ट दरम्यान, आयशर वाहनात तांदुळाच्या भुसा भरलेल्या गोण्यांच्या आडून गुजरात राज्यात अवैधरित्या विदेशी दारूची होणारी वाहतूक थांबविली आहे. या कारवाईत पोलिसांनी १० लाख ३६ हजारची दारू व ६ लाखाचे वाहन असा एकूण १६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गुजरात राज्यात आयशर वाहनातून (क्र.एमएच १५ एफव्ही ९७०३ ) अवैधरित्या विदेशी दारुची वाहतूक होत होती. यासंदर्भात पिपळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांना गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी पथक तयार केले. यापथकाने गुजरात महाराष्ट्र महामार्गावरील मांजरी ते नकट्या हनुमंत चेक पोस्टजवळ पाठलागग करुन पकडले. परंतु, वाहनातील दोघे वाहून सोडून पळून जाण्यात यशस्वी झालेत.
पोलीस पथकाने वाहनाची तपासणी केली असता वाहनात तांदुळाच्या भुसा भरलेल्या गोण्या आढळून आल्या. या गोण्यांखाली रॉयल ब्ल्यु व्हिस्की नावाच्या विदेशी दारुचे १०८ बॉक्स आढळून आले. एकूण १० लाख ३६ हजार ८०० रुपये किंमतीची रॉयल ब्ल्यु व्हिस्की तसेच ६ लाख रुपये किंमतीचे वाहन असा एकुण १६ लाख ३६ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास सपोनी किरण बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.