जळगाव : महाराष्ट्र विधानसभेची निवडनुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाकडून लवकरच जाहीर केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पत्रके, भित्तीपत्रके आदीच्या मुद्रणांचे संनियंत्रणासाठी जळगाव जिल्हयातील सर्व मुद्रणालये यांचे लक्ष लोकप्रतिनिधीत्व कायद्याचे कटाक्षाने पालन व्हावे असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
कोणत्याही व्यक्तीला, निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रकाच्या दर्शनी भागावर त्याच्या मुद्रकाचे आणि प्रकाशकाचे नाव व पत्ता नसेल असे कोणतेही मुद्रित वा प्रकाशित करता येणार नाही. निवडणुकीसाठी असणारी पत्रके, छापील साहित्य यावर प्रकाशक आणि मुद्रक यांची नावे असणे आवश्यक आहेत.
कोणत्याही व्यक्तीला निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रक ती स्वत:च त्याचा प्रकाशक आहे या बद्दलचे त्याने स्वत: स्वाक्षरी केलेले व त्यावर दोन ओळखणा-या व्यक्तींनी साक्षांकित केलेले अधिकथन मुद्रकास दिल्याशिवाय मुद्रकाने मुद्रण करू नये. दिलेल्या सुचनांप्रमाणे निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रक प्रकाशित करणा-या व्यक्तीने कार्यवाही केल्यावर आणि मुद्रकाने मुद्रण केल्यानंतर मुद्रित साहित्याची प्रत जिल्हा निवडणुक अधिकारी जळगाव तसेच संबंधित निवडणुक निर्णय अधिकारी यांचेकडे पाठवावयाची आहे. अन्यथा संबंधित मुद्रणालयाचे लायसन्स रद्द करण्यासह कठोर कारवाई करणेत येईल.
या ठिकाणी निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रक याचा अर्थ उमेदवाराच्या प्रचारासाठी वाटण्यात आलेले मुद्रतपत्रक, हस्तपत्रक किंवा अन्य दस्तऐवज किंवा निवडणुकीशी संबंधित असा घोषणाफलक किंवा भित्तीफलक असा होतो.जी व्यक्ती उपरोक्त निर्बंधांचे व्यतिक्रमण करील ती व्यक्ती सहा महिन्यापर्यंत असु शकेल इतक्या मुदतीच्या कारावासास किंवा दोन हजार रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडास किंवा दोन्ही शिक्षास पात्र असेल.
विधानसभा निवडणूक लढविणारे उमेदवार, राजकीय पक्ष तसेच मुद्रणालय चालक यांनी या सूचनांची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी आयोगाचे या संबंधित निर्देशांचे अवलोकन करावे असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरविंद अंतुर्लीकर यांनी नमूद केले आहे.