---Advertisement---
जळगाव : जिल्ह्यात वेळेवर दाखल झालेल्या जुलै अखेरच्या टप्प्यात पावसाने दडी मारली आहे. जुलै अखेरीसह ८६ महसूल मंडळापैकी केवळ १३ महसूल मंडळांमध्ये पावसाने सरासरी गाठली आहे. जळगाव जिल्ह्यात ८३ महसूल मंडळापैकी २२ मंडळांमध्ये ५० टक्क्यांपेक्षाही कमी पर्जन्यमान आहे. त्यात पेरणी व मशागतीनंतर पाऊस लांबणीवर पडल्याने पिके कोमेजत आहेत. जिल्ह्यात पावसाच्या तुटीमुळे जळगाव जिल्हा ‘रेड झोन मध्ये आला असून जिल्ह्यावर दुष्काळाचे गडद सावट असल्याचे दिसून येत आहे.
सरासरी ३० टक्के तूटच
हवामान विभागाकडून जळगाव जिल्ह्याचे पर्जन्यमान ६६३.३३ मिलीमीटर आहे. जून महिन्यात पावसाने सरासरी गाठली असली तरी जुलैमध्ये मात्र केवळ २० दिवस पाऊस झाला आहे. जुलैचे पर्जन्यमान १८९.२० मिलीमीटर असून सरासरी ११९.९ मि.मी. म्हणजेच ६३.४ टक्के पाऊस झाला असून तब्बल ३० टक्के तूट आहे. तर सद्यस्थितीत ऑगस्टमध्ये देखील ढगाळ वातावरण असले तरी
पावसाने हुलकावणी दिल्याने उष्णतेत कमालीची वाढ झाली आहे.
तूट राहिल्यास दुष्काळ
गेल्या दोन दिवसापूर्वीच हवाम ान विभाग अभ्यासकांनी कमी पर्जन्यमानाचे जिल्ह्यांची वर्गवारी निर्देशीत केली असून यात जळगाव जिल्ह्याचाही समावेश आहे. आगामी दोन तीन दिवसात पाऊस न आल्यास आणि तूट अशाच प्रकारे कायम राहिली तर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट पसरण्याची शक्यता आहे. संपूर्ण जिल्ह्यात कमी पाऊस असून जुलै अखेर भडगाव आणि चाळीसगाव तालुक्यानी सरासरी गाठलेली आहे. भुसावळ, पारोळा, एरंडोल, मुक्ताईनगर, पाचोरा आणि बोदवड तालुक्यांमध्ये सरासरी ७३ टक्क्यांच्या जवळपास पाऊस आहे. तसेच जामनेर आणि जळगाव तालुक्यात जेमतेम ५० टक्के सरासरी गाठली आहे.
जिल्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर
यावल, रावेर, अमळनेर, चोपडा, धरणगाव या पाच तालुक्यांमध्ये सरासरी ५० टक्के देखील पाऊस झालेला नसून हे पाच तालुके सद्यस्थितीत रेड झोनमध्ये आहेत. त्यामुळे संपूर्ण जिल्हाच दुष्काळी वातावरणाकडे झुकला असल्याचे दिसून येत आहे.
१५ ऑगस्टनंतर दमदार पावसाची शक्यता कमीच सद्यस्थितीत जळगाव जिल्ह्यात ढगाळ वातावरण असले तरी तापमान कमाल ३२ तर किमान २९ अंश आणि हवेतील आर्द्रतेचे प्रमाण देखील ५० टक्केपेक्षा कमी आहे. त्यामुळे उन्हाचे चटके जाणवून येत आहेत. १५ ते १७ ऑगस्ट या दोन तीन दिवसांदरम्यान तुरळक ते मध्यम स्वरूपाचा अंदाज आहे. त्यानंतरसुद्धा आठवडाभर पावसाची शक्यता कमी आहे.
५० टक्केही हंगाम कठीण
गेल्या चार पाच वर्षात सप्टेंबर ऑक्टोबर अखेर सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान झाले असून हा पाऊस खरीप पिकांसाठी धोकेदायक ठरलेला आहे. यंदा ऑगस्ट अर्धा कोरडा असून अशीच परिस्थिती राहून सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये ऐन कापणी काढणीच्या हंगामावेळी पाऊस झाला तर ५० टक्केही खरीप उत्पादन हाती येणे कठीण असल्याची शक्यता आहे.
पावसाची हुलकावणी
जिल्ह्यात ८ ऑगस्टपर्यंत सरासरी ३५५ ते ३६० मिलीमीटर पर्जन्यमान अपेक्षित होते. मात्र, आतापर्यंत केवळ सरासरी २५० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर गतवर्षी ५ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात ४३२ मिलीमीटर पावसाची नोंद होती. यावर्षी मात्र जिल्ह्यात सरासरीच्या केवळ ७१ टक्के पाऊस झाला असून सध्यातरी तब्बल २९ टक्के पावसाची तूट आहे.
पाचोरा तालुक्यात ३ टँकर
जिल्ह्यात जून अखेर २० गावांसाठी २५ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. शासनाच्या निर्दे शानुसार ३० जून नंतर टँकर बंद करण्यात येतात. परंतु, मान्सूनदरम्यान पर्जन्यमान समाधानकारक नसल्याने आणि पाणीटंचाई पहाता जुलैच्या दुसऱ्या सप्ताहात १९ टँकर पाणीपुरवठ्यासाठी मुदत वाढीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. सद्यस्थितीत पाचोरा तालुक्यात लोहारा येथे खासगी तीन टँकरने अद्यापही पाणीपुरवठा केला जात असून आतापर्यंतच्या झालेल्या पावसामुळे अन्यत्र ८ ऑगस्ट दरम्यान सर्वच गावांचे टँकर बंद करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.