जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगातर्फे पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पुन्हा विविध विषयांच्या ९ जागा मंजूर झाले असून आतापर्यंत ६० जागांना मान्यता मिळाली आहे. यामुळे महाविद्यालयाच्या स्थापनेनंतर केवळ ७ वर्षातच अल्पावधीमध्ये मोठे यश मिळाले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास दि. २६ नोव्हेंबर रोजी प्राप्त झालेल्या राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या आदेशानुसार पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या नवीन जागा तसेच इतर विषयात रुग्णसेवेची निकड लक्षात घेता वाढीव जागा मंजुर करण्यांत आलेल्या आहेत. यात नव्याने सुरु झालेले पदव्युतर अभ्यासक्रमांमध्ये नेत्रशल्यचिकित्साशास्त्र विभागाला एकुण ३ जागा, न्यायवैद्यकशास्त्र विभागाला एकुण ३ जागा तर वाढीव मंजुर झालेले पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम जागांत बधिरीकरणशास्त्र विभागाला १ जागा मंजूर झाली असून आतापर्यंत एकूण पाच जागा मिळाल्या आहेत.
अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागाला आता दोन जागा मिळाल्या असून एकूण तीन जागा झाल्या आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,जळगांव येथे नव्याने पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमास मान्यता व रुग्णसंख्येचा विचार करुन वाढीव जागाकरीता केंद्र शासनाने विशेष बाब म्हणून मान्यता दिली व मानाचा तुरा खोवलेला आहे. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.गिरीष ठाकुर यांनी विशेष प्रयत्न केले. यासाठी केंद्र शासनाने जवळपास २ ते ३ वेळा नवी दिल्ली येथे सुनावणी घेतली.
त्याठिकाणी या वैद्यकीय महाविद्यालयाची प्रकर्षाने बाजु मांडुन या वैद्यकीय महाविद्यालयास जो मानसन्मान मिळवून दिला त्याबद्दल वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिकारी, कर्मचारी वृंदाकडून त्यांचे कौतूक होत आहे. प्रस्तावासाठी डॉ.विश्वनाथ पुजारी, प्राध्यापक, क्षयरोग व उरोशास्त्र तसेच डॉ.योगीता बावस्कर, विभाग प्रमुख,जनऔषधवैद्यकशास्त्र यांनी विशेष प्रयत्न केलेले आहे.
“जळगावच्या शासकीय विद्यकीय महाविद्यालयासाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमाला आता ६० जागांना मान्यता मिळाल्याने अल्पावधीतच मोठे यश मिळाले आहे. विद्यार्थ्यांना या ठिकाणी चांगले प्लॅटफॉर्म मिळणार असून रुग्णसेवेत देखील मदत होणार आहे. आगामी काळात मंजूर जागा १०० पर्यंत नेण्यासाठी प्रयत्न राहणार आहे.”
– डॉ. गिरीश ठाकूर, अधिष्ठाता