“एकनाथ शिंदेंचं विमानही पाडलं गेलं असतं?” रोहित पवारांचा गंभीर दावा; VSR कंपनीवर प्रश्नचिन्ह?

---Advertisement---

 

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणाऱ्या पत्रकार परिषदेत आमदार रोहित पवार यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. २८ जानेवारीला झालेल्या विमान अपघातात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदांच्या मालिकेतील हा तिसरा भाग होता. या वेळी त्यांनी अपघाताच्या घटनाक्रमावर तसेच तपास करणाऱ्या संस्थांच्या कामकाजावर ताशेरे ओढत “कुणाच्यातरी दबावाखाली हा प्रकार घडला का?” असा थेट सवाल केला. घातपाताचा संशयही त्यांनी व्यक्त केला.

या पार्श्वभूमीवर त्यांनी आणखी एक धक्कादायक दावा केला. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोसला जात असताना त्यांच्या विमानाच्या उड्डाणादरम्यान गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती, असे पवार म्हणाले. कोणतेही विमान आंतरराष्ट्रीय मार्गाने जाताना संबंधित देशांची पूर्वसंमती घेणे बंधनकारक असते. मात्र शिंदेंचे विमान दावोसला जाताना इराण आणि इराक या दोन्ही देशांची आवश्यक परवानगी VSR कंपनीने घेतली नव्हती, असा आरोप त्यांनी केला.

पवारांच्या दाव्यानुसार, इराणकडून “मार्ग बदलला नाही तर विमान पाडण्यात येईल” असा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर विमानाला इराकच्या दिशेने वळवण्यात आले; मात्र तिथेही समान प्रकारचा इशारा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. अखेर विमान बहरीन येथे उतरवण्यात आले. तेथे सुमारे तीन तास विमान थांबवून आवश्यक संमती घेतल्यानंतरच पुढील उड्डाणाला परवानगी मिळाली, असा दावा पवारांनी केला. “थोडा उशीर झाला असता तर इराणच्या लढाऊ विमानांनी ते विमान पाडले असते,” अशी माहिती आमच्याकडे आल्याचेही ते म्हणाले.

या संपूर्ण प्रकाराबाबत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) अधिकृत माहिती प्रसिद्ध केली का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच “याबाबत एकनाथ शिंदे स्वतःही स्पष्ट बोलू शकतात,” असेही त्यांनी नमूद केले.

VSR कंपनीवर थेट प्रश्न उपस्थित करत पवार म्हणाले की, आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी आवश्यक क्लिअरन्स का घेण्यात आली नाही? VSR विमानांच्या वादानंतर अनेकांनी इतर कंपन्यांची विमाने आणि हेलिकॉप्टर वापरण्यास सुरुवात केली, तरीही काही नेते अद्याप या कंपनीची सेवा घेत असल्याचा आरोप त्यांनी केला.
पत्रकार परिषदेत त्यांनी आणखी एक मोठा खुलासा केला. VSR कंपनीचे मालक विजयसिंह यांनी त्यांच्या एका सहकाऱ्याला फोन करून “आम्हाला AIB कडून क्लिअरन्स मिळाले आहे, सरकारमधील वरपर्यंत आमची ओळख आहे, अजूनही आमची विमाने वापरली जात आहेत,” असे सांगितल्याचा दावा त्यांनी केला. या संभाषणाची व्हिडिओ क्लिपही त्यांनी पत्रकार परिषदेत प्ले केली.

दरम्यान, या सर्व आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे. पवारांच्या दाव्यांवर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली, तरी या आरोपांमुळे विमान उड्डाण सुरक्षा आणि राजकीय जबाबदारी या दोन्ही मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---