Cyber ​​Fraud : सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत वृद्ध दांपत्याची फसवणूक

Cyber ​​Fraud जळगाव :  दररोज सायबर गुन्हेगारांकडून विविध वेगवेगळे फंडे वापरून सर्वसामान्यांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार समोर येत आहेत. हे गुन्हेगार नवीन-नवीन तंत्रज्ञान आणि सायबर पद्धती वापरून लोकांना फसवित आहेत. यात  फोन कॉल्स, व्हाट्सअॅप संदेश, बनावट ईमेल्स, सोशल मीडिया प्रोफाइल्स आणि ऑनलाइन फसवणूकीचे अनेक प्रकार घडत आहेत. अशाच सायबर फावणुकीस यावल येथील एक वृद्ध दांपत्य बळी पडल्याची घटना उघड झाली आहे.  याप्रकरणी, ऑनलाईन व यावल पोलिसांत अज्ञात मोबाईलधारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव जिल्ह्यातील यावल शहरात राज्य परिवहन मंडळाच्या एका सेवानिवृत्त कर्मचारी वास्तव्यास आहेत. ते त्यांच्या पत्नीसह राहतात. त्यांचा मुलगा मुंबई येथे ऐरोलीतील कंपनीत नोकरी करतो. त्यांना बुधवार, २५ रोजी सकाळी ११  वाजेच्या सुमारास व्हाटसअप अज्ञात व्यक्तीने कॉल केला. त्याने आपण सीबीआय अधिकारी असल्याचे भासवत या दाम्पत्यास तुमच्या मुलाने गैरकृत्य केले असून आम्ही त्याला ताब्यात घेतले आहे असे सांगितले. यानंतर त्या बनावट सीबीआय अधिकाऱ्याने या दाम्पत्याकडे १ लाख ३० हजार रुपयांची मागणी केली. यावेळी त्या बनावट अधिकाऱ्याने त्यांच्या मुलाचा भयभीत अवस्थेतील बनावट ऑडिओ क्लिप ऐकवली. मुलाचा आवाज ऐकताच वृद्ध दाम्पत्य घाबरले असता तात्काळ आपल्या खात्यातून पैसे फोन पे खात्यावर पाठवले.

त्यानंतर, वृद्ध दांपत्याने त्याच्या मुलाला कॉल केला, तेव्हा मुलाने सांगितले की, तो मुंबईत आहे आणि त्याला काहीही समस्या नाही. त्यामुळे त्यांना समजले की, ते फसवले गेले आहेत. यानंतर त्यांनी ऑनलाईन तसेच यावल पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईल वापरकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हा प्रकार सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांना दर्शवतो आणि नागरिकांना सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे महत्त्व पटवून देतो.