जळगाव जिल्ह्यात जळगाव ग्रामीण, रामदास माळी :मतदारसंघात आजी-माजी मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या मतदारसंघात महायुतीकडून बाळासाहेब शिवसेना शिंदे गटाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व महाविकास आघाडीकडून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी मंत्री गुलाबराव देवकर रणांगणात उतरले आहेत. राजकीयदृष्ट्या शिंदे गटात प्रवेश केलेले पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर कोण उमेदवार द्यायचा यचा आणि ही जागा महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाला सोडायची यावर एकमत होत नसल्याने महाविकास आघाडीकडून गुलाबराव देवकर यांची उमेदवारी जाहीर करण्यास उशीर झाला.
जळगाव ग्रामीण मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत मतदारांनी ३० हजारांहून अधिक मताधिक्क महायुतीला दिले आहे. त्यामुळे महायुती याठिकाणी प्रबळ मानली जात आहे. मात्र या निवडणुकीत आजी-माजी मंत्र्यांत ही लढत रंगणार असल्याने जिल्ह्याचे लक्ष याकडे लागले आहे. धनुष्यबाण व तुतारी यांच्यात लढत रंगणार आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरोधात उबाठा गटाचाच उमेदवार रणांगणात राहणार असत्याचे निश्चित झाले होते. मात्र ऐनवेळी याठिकाणी याठिकाणी फेरबदल करून ही जागा शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीला सोडण्याचा निर्णय महाविकास आघाडीकडून घेण्यात आला. त्यामुळे या मतदारसंघातील राजकीय गणितेही बदलली. मात्र या खेळीचा महाविकास आघाडीला किती फायदा होणार यांचा अंदाज लावणे आजतरी शक्य नाही.
३ लाख ३५ हजार मतदार
जळगावी ग्रामीण मतदारसंघात ३ लाख ३५ हजार ३८३ मतदार असून त्यात १ लाख ६३ हजार ६२१ महिलांचे तर १ लाख ७१ हजार ७५८ पुरूषांचे मतदान आहे. तसेच नवमतदारांची संख्या १२ हजार ८०२ एवढी आहे. त्यात ज्येष्ठ नागरिक मतदारांची संख्या ४ हजार २९० आहे. नवमतदार व महिला यांची भूमिका या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे.
ताकदीचा उमेदवार न मिळाल्याने जागा राष्ट्रवादीला
मंत्री गुलाबराव पाटील जळगाव ग्रामीण मतदारसंघातून महायुतीकडून रिंगणात उतरले आहेत. त्यांचा गेल्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघात असलेला तगडा जनसंपर्क त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. उबाठा शिवसेनेतून त्यांनी शिंदे गटात प्रवेश करीत ते महायुतीत सहभागी झाले आहेत. मतदारसंघात या निवडणुकीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून गुलाबराव देवकर नशीब आजमावत आहेत. मात्र या मतदारसंघात गेल्या काही वर्षांपासून गुलाबराव देवकर यांचा संपर्क फारसा नसल्याने त्यांना जनता किती कौल देणार हे मतदानाच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. गुलाबराव पाटील यांच्याविरोधात उबाठा शिवसेनेला ताकदीचा उमेदवार न मिळाल्याने ही जागा शरद पवार राष्ट्रवादी गटाला सोडण्यात आल्याचे सांगितले जात आहे.