Election Bulletin : जळगाव शहर मतदारसंघात कोण ठरणार बाजीगर!

जळगाव, रामदास माळी : जळगाव शहर मतदारसंघात महायुतीतर्फे आमदार सुरेश भोळे व महाविकास आघाडीच्या उमेदवार, माजी महापौर जयश्री महाजन यांच्यात लढत होत आहे. जळगाव शहर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. या मतदारसंघात भाजपाकडून सन २०१४ व २०१९ मध्ये सुरेश भोळे यांना जनतेने कौल दिला आहे. या निवडणुकीत मतदार कोणाची निवड करतात, त्यावर उमेद्वाराच्या विजयाचे गणित ठरणार आहे. या मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

आमदार भोळे भाजपाकडून तिसऱ्यांदा मैदानात उतरले आहेत. त्यातच नगरसेवकाप्रमाणे त्यांनी ठेवलेला जनसंपर्क त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. दुसरीकडे उबाठाकडून निवडणूक लढविणाऱ्या जयश्री महाजन या माजी महापौर आहेत. त्यामुळे त्यांचाही शहरात काही काळापासून जनसंपर्क आहे. मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उबाठा शिवसेनेच्या तिकिटावर माजी महापौर जयश्री महाजन नशीब अजमावित आहेत. माजी महापौर महाजन यांनी विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याची तयारी वर्षभरापासून सुरू केली होती. आमदार सुरेश भोळे यांनी शहरातील मूलभूत प्रश्न सोडविण्याला प्राधान्य दिले. त्यात शहरातील रस्त्यांचे रूपडे पालटत आहे. मात्र अजूनही रस्ते, गटारीच्या समस्या काही भागात सुटलेल्या नाहीत. जळगाव शहर मतदारसंघात सुशिक्षित मतदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे शिक्षित मतदार या निवडणुकीत कोणाच्या बाजूने कौल टाकणार यावर उमेदवाराचे भवितव्य ठरणार आहे.

जळगाव शहरातील मतदार संख्या जवळपास साडेचार लाख असून, लोकसंख्या साडेपाच लाखांहून अधिक आहे. त्यातच शहरात जिल्हाभरातून विविध कामकाजासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. जिल्हाभरातून दररोज रेल्वे आणि बसच्या माध्यमातून ४० ते ५० हजार नागरिक शहरात कामानिमित्त दाखल होत असतात. त्यांचा ताण आपोआपच शहरातील सेवा सुविधांवर पडत असतो. त्यामुळे आगामी काळात प्रशासकीय यंत्रणेला शहरात कोणत्याही सुविधा व विकासकामे करताना हा मुद्दा विचारात घेऊनच कामे करावी लागणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत पुरुषांचे ५५ टक्के, तर महिलांचे ५० टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत नवमतदारांची भूमिकाही निर्णायक ठरणार आहे. या मतदारांची संख्या १५ हजारांहून अधिक आहे. जळगाव शहरातून महायुतीकडून आमदार सुरेश भोळे व महाविकास आघाडीकडून माजी महापौर जयश्री महाजन, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अनुज पाटील तर अपक्ष म्हणून मतदारसंघात निवडणूक लढविणाऱ्यांची संख्याही मोठी असणार आहे. जळगाव शहर हा लेवा बहुल मतदारसंघ असल्याने महायुती व महाविकास आघाडीकडून लेवा समाजाचा उमेदवार देण्यात आला आहे. त्यामुळे या लढतीकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

त्यातच माजी महापौर कुलभूषण पाटील, माजी उपमहापौर अश्विन सोनवणे यांनी अपक्ष उमेदवारीबाबत स्पष्टता केल्याने महायुती व महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना हा घरचा अहेर ठरणार आहे. जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराला मतदारांकडून प्रतिसाद दिला जात नाही. मात्र या निवडणुकीत मतदाराजा कोणाला पसंती देणार है मतदानाच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

मतदारसंघात ४ लाख २९ हजार मतदार
जळगाव शहर मतदारसंघात एकूण ४ लाख २९ हजार मतदार आहेत. त्यात २ लाख २२ हजार २३३ पुरुष तर २ लाख ६ हजार ९५८ महिला मतदार आहेत. यात १५ हजार ३९७ नवमतदार आहेत. यात ९ हजार ११० युवकांची, तर ६ हजार २८७ युवर्तीची संख्या आहे.

लोकसभेचे मताधिक्य कुणाच्या पथ्यावर ?
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारास जळगाव शहर मतदारसंघातून ३५ हजारांहून अधिकचे मताधिक्य होते. त्यामुळे जिल्ह्यात भाजपा लोकसभेच्या निकालानुसार आघाडीवर आहे. या गणितावरच या मतदारसंघात विजयाचे गणित ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेले मताधिक्य विधानसभेसाठी भाजप उमेदवारासाठी तारक ठरेल असे चित्र सद्यस्थितीत दिसून येत आहे