---Advertisement---
शाळकरी मुले हेच देशाचे खरे भवितव्य असून त्यांना निरोगी व सक्षम घडवण्यासाठी लहानपणापासूनच संतुलित आहार आणि पर्यावरणाचे महत्त्व समजावून सांगणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी केले.
जिल्हा परिषद जळगावच्या शाहू महाराज सभागृहात जिल्हा परिषद शिक्षण विभाग व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “संतुलित आहार – निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली” आणि पर्यावरण विषयक पुस्तिकांच्या प्रकाशन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमाला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य अनिल झोपे, प्रा. चंद्रकांत साळुंखे, शिक्षण अधिकारी निलेश पाटील तसेच विविध अधिकारी व शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमात जिल्ह्यातील शिक्षकांच्या समूहाने तयार केलेल्या संतुलित आहार व पर्यावरण विषयक पुस्तिका तसेच बंजारा भाषेवरील पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
यावेळी बोलताना मिनल करनवाल म्हणाल्या की, सध्या विद्यार्थ्यांमध्ये जंक फूडचे सेवन वाढत असल्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती होणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच पर्यावरणाबाबत संवेदनशीलता निर्माण व्हावी आणि समाजामध्ये व्यापक जनजागृती व्हावी या उद्देशाने या पुस्तिकांची निर्मिती करण्यात आली आहे. या पुस्तिकांच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक व पालकांमध्ये आरोग्य आणि पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण होईल
.
त्या पुढे म्हणाल्या की, अधिकारी बदली होऊन गेले तरी अशा प्रकारच्या पुस्तिकांच्या माध्यमातून हा उपक्रम दीर्घकाळ सुरू राहू शकतो. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करून हा उपक्रम जिल्हाभर प्रभावीपणे राबवावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य अनिल झोपे यांनी केले. त्यांनी या उपक्रमामागील उद्देश व पुस्तिका निर्मितीची पार्श्वभूमी स्पष्ट केली. यावेळी पुस्तिका निर्मितीत योगदान देणाऱ्या शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानही करण्यात आला.









