---Advertisement---
एरंडोल : तालुक्यातील खर्ची येथे मंगळवारी (१७ जून) रोजी तेजस गजानन महाजन (वय १३, रा. रिंगणगाव ता. एरंडोल) याचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, याप्रकरणी एरंडोल पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले असून नरबळीचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
तेजस महाजन हा रिंगणगाव येथे आपल्या कुटुंबियांसोबत वास्तव्याला होता. त्याच्या कुटूंबात आई, वडील, मोठी बहीण यांचा समावेश आहे. त्याचे वडील गजानन महाजन हे शेती कामांसोबतच हार्डवेअरचे दुकान चालवून आपला चरितार्थ चालवतात. गजानन हे सोमवारी ( १६ जून ) जळगावला कामानिमित्त गेले होते. दरम्यान, त्यांनी तेजस यास दुकानावर बसविले होते. तेजस हा दुकान बंद करून घरी जाणे कुटुंबीयांना अपेक्षित होते. मात्र , तेजस घरी परतलाच नाही.
यामुळे कुटुंबियांनी ग्रामस्थांच्या मदतीने शोधाशोध सुरू केली. मात्र, तो मिळून न आल्याने कुटुंबीयांनी एरंडोल पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपासचक्र फिरवीत तेजसचा शोध रात्रभर सुरू ठेवला होता. दरम्यान, त्याचा मृतदेह
मंगळवारी पहाटेच्या सुमारास खर्ची गावाजवळ निंबाळकर यांच्या शेतात गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला.
नरबळीचा संशय
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले असून नरबळीच्या प्रकारातून ही हत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे. दरम्यान, बालकाची हत्या करण्यामागील कारण काय याबाबतचा सखोल तपास पोलीस करत असून खुनाच्या घटनेमुळे जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे.