Dharangaon Crime News : कर्ज फेडण्याच्या विवंचनेतून शेतकऱ्याने उचललं टोकाचं पाऊल

धरणगाव :  तालुक्यात जुलै महिन्यापासून कर्ज फेडण्याच्या विवेचनांतून आतापर्यंत दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यात चोरगाव व कवठळ येथील शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यातच गुरुवारी झुरखेडा येथील शेतकऱ्याने डोक्यावरील कर्जामुळे हताश होऊन राहत्या घरात गळफास घेत जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली.  धरणगाव पोलिसात याची नोंद करण्यात आली आहे. दिपक शिवाजी चौधरी (वय ४२ रा. झुरखेडा ता. धरणगाव) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.

दिपक चौधरी हे झुरखेडा गावात आई, पत्नी व दोन मुलं यांच्या सोबत राहत होते. त्यांची पत्नी ह्या गुरुवार, २८  नोव्हेंबर रोजी शेतीकामासाठी गेल्या होत्या. त्याचवेळी दिपक चौधरी हे घरी एकटे असताना त्यांनी दुपारी एक वाजेच्या सुमारास  गळफास घेतल. त्यांच्यावर कर्जांचा डोंगर होता, त्यांनी शेतीकरीत खासगी व सोसायटीकडून ५ लाखांचे कर्ज घेतले होते. त्यात सततची नापीकीमुळे ते गेल्या काही दिवसांपासून आर्थिक विवंचनेत होते, अशी माहिती त्यांच्या गावातील नातेवाईकांनी दिली.

दुपारी त्यांची पत्नी घरी आल्यावर दिपक चौधरी यांचा आत्महत्येचा प्रकार उघड झाला. शेजारी राहणाऱ्या तरूणांनी त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. याबाबत धरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.