---Advertisement---
मुक्ताईनगर : शेतकऱ्यांच्या जमिनींचे खामखेडा पूल व इंदूर रस्त्यासाठी संपादन करण्यात आले आहे. या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी वारंवर आंदोलन करण्यात आले आहे. या प्रकल्पाकरिता जवळपास अडीचशे ते तीनशे शेतकऱ्यांच्या शेत जमीन संपादित करण्यात आल्या आहेत. या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा याकरिता अनेक बैठका घेण्यात आल्या आहेत. परंतु, आद्यपही समाधानकारक तोडगा न निघाल्याने अखेर शेतकऱ्यांनी त्यांच्या कुटुंबांसह जलसमाधी आंदोलन पुकारले.
या आंदोलनात सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि शिवसेना (शिंदे गट) नेते चंद्रकांत पाटील यांनी थेट सहभागी होत शेतकऱ्यांना पाठिंबा दिला. आमदारांच्या सहभागाने राजकीय व सामाजिक दृष्टया एक विशेष महत्त्व प्राप्त झाले. यावेळी आंदोलनस्थळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
---Advertisement---

आमदार चंद्रकांत पाटील यांनी आंदोलनस्थळी बोलतांना सांगितले की, “मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, सत्तेत असो की नसू – आंदोलन करणे हे माझं कर्तव्य आहे. शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहणं हे कर्तव्य आहे. जर सरकारकडून शेतकऱ्यांना न्याय मिळत नसेल, तर आंदोलन हाच मार्ग आहे. उभ्या केळीच्या बागा कापून रस्ते काढले जात आहेत. पावसाळ्यात कोणता ठेकेदार पूलाचं काम करतो हे दाखवून द्यावं. या जमिनींवर आमच्याही घराचं पोट भरत आहे. सरकार त्याच भावाने आमचं घर किंवा शेत विकत घेईल का ? महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत सकारात्मक बैठक झाली होती, पण प्रकल्प अधिकारी पीडी पवार हे तुघलकी कारभार करत आहेत,” असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.
दरम्यान, प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले. मात्र, मोबदल्याबाबत ठोस निर्णय होईपर्यंत संघर्ष सुरूच राहणार असल्याचा निर्धार शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.