---Advertisement---
---Advertisement---
Faijpur News : मध्य रेल्वेच्या भुसावळ ते खंडवा दरम्यान प्रस्तावित तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे लाईनसाठी रावेर तालुक्यातील गहुखेडे व रणगाव या गावांमध्ये होणाऱ्या जमिनी संपादनाच्या प्रक्रियेला स्थानिक शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध होत आहे. भारत सरकारच्या अधिसूचनेनंतर शेतकऱ्यांनी फैजपूर उपविभागीय अधिकाऱ्यांना एकत्र येऊन निवेदन दिले असून, भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
शासन व प्रशासन या विरोधाची काय दखल घेते, शेतकऱ्यांची एकजूट आणि त्यांच्या मागण्यांचे गांभीर्य लक्षात घेता शेतकरी व शासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. ७ जुलै रोजी भारत सरकारच्या राजपत्रात रेल्वे सुधारित अधिनियम २००८ अंतर्गत कलम २०-ए नुसार या संपादनाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली.
त्यानुसार गहुखेडे व रणगाव येथील एकूण ७० गटांतील सुमारे २१ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. या निर्णयाविरोधात बाधित शेतकरी एकवटले असून त्यांनी आज फैजपूर येथे उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर केले. या निवेदनात त्यांनी आपली आक्रमक भूमिका मांडली आहे.
शेतकऱ्यांनी अधोरेखित केले की, प्रस्तावित रेल्वे लाईन ही बारमाही बागायती जमिनीवरून जाणार आहे, जी केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असून विदेशात निर्यातही होते. ही जमीनच त्यांची मुख्य उपजीविकेची साधनं असल्यामुळे ती गेल्यास संपूर्ण कुटुंब उपासमारीच्या उंबरठ्यावर येईल, असा इशारा त्यांनी दिला.