धुळे: चार वर्षाच्या मुलाने दिलेल्या साक्षीने त्याच्या आईचा मारेकरी असेलेल्या वडिलांना जन्मठेपेची शिक्षा सत्र न्यायाधीश डी एम आहेर यांनी सुनावली आहे.ही साक्ष खटल्यात महत्त्वाची ठरुन मारेकऱ्याला जन्मठेपेची शिक्षा मिळाली आहे.
शिरपूर तालुक्यातील दहिवद येथे ही घटना 18 ऑगस्ट 2022 रोजी घडली होती. मूळ मध्य प्रदेश येथील रहिवासी असलेला आरोपी संजय मुकेश पावरा हा शिरपूर तालुक्यातील दहिवद शिवारात शेतमजूर म्हणून काम करत होता. त्याचे पत्नी बलाबाई आणि मुलांसह याच शेतात वास्तव्य होते. या शेताशेजारी असलेल्या दुसऱ्या शेतात बालाबाई यांचे आई-वडील देखील शेतमजूर म्हणून कामास होते. ते देखील त्याच शेतावर वस्ती करून राहत होते. आरोपी संजय यास दोन मुली व एक मुलगा अशी अपत्ये आहेत. संजय आणि बालाबाई यांच्यामध्ये नेहमी स्वयंपाकाच्या कारणावरून तसेच अन्य किरकोळ कारणावरून त्यांच्यात नेहमीच वाद होत असत.
आरोपी संजय पावरा हा पत्नी बालाबाई हीला सतत तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन दारु पिऊन शिविगाळ व मारहाण करीत असे. याच प्रमाणे १४ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. या भांडणांत आरोपी संजय याने बालाबाई हिला मारहाण केली. या मारहाणीत तिच्या डोक्यावर, तोंडावर, पायांवर कु-हाडीने व तसेच लोखंडी पहारने व लाकडी दांडक्याने निर्घृणपणे घाव करत तिचा खून केला.
या घटनेचा आरोपी व मयत बालाबाई यांचा मुलगा रोहित (वय-४ वर्ष ) प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होता. हा खुनाचा प्रकार रोहित समोरच झाल्याने आरोपीने त्याला देखिल मारुन टाकण्याची धमकी दिली होती. संजय पावरा याच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल झाला. गुन्हाचे तपास तपासी अंमलदार उमेश बोरसे यांनी सखोल चौकशी करुन आरोपी विरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते. आरोप निश्चिती नंतर खटल्याची सुनावणी धुळे येथील सत्र न्या. डी.एम. आहेर, यांच्या न्यायालयात सुरु झाली.
सुनावणीच्या वेळेस अतिरीक्त जिल्हा सरकारी वकील पराग मधुकर पाटील, यांनी फिर्यादी सुलाबाई सरप्या पावरा, घटनास्थळ पंच, वैद्यकीय अधिकारी तसेच कपडे जप्ती पंचनामा शव विच्छेदन करणारे वैद्यकीय अधिकारी तसेच पोलीस श्वान पथकातील अधिकारी यांची साक्ष तपासली. तसेच या खुनांच्या गुन्ह्याच्या खटल्यातील महत्वाचा साक्षीदार ठरलेला आरोपीचा व मयताचा मुलगा रोहित याची साक्ष महत्त्वाची ठरली.
घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार रोहित (वय वर्ष ४ ) याने साक्ष देताना न डगमगता सर्व घटनेची इत्यंभुत माहिती दिली. माझ्या वडीलांनीच माझ्या आईचा खून केला हे स्पष्टपणे सांगितले. तसेच या कामी झालेल्या उलट तपासणीत देखिल त्याने न डगमगता आपली साक्ष नोंदविली.
साक्षीदार आणि पुराव्यांच्या आधारावर न्यायालयात अतिरीक्त जिल्हा सरकारी वकील पराग मधुकर पाटील, यांनी प्रखर व प्रभावी युक्तीवाद केला. सर्वोच्च न्यायालय व विविध उच्च न्यायालयाचे दाखले न्यायालयात युक्तीवादा दरम्यान सादर करण्यात आले. त्यानुसार न्यायालयाने संजय पावरा याला कुणाच्या आरोपात दोषी धरुन जन्मठेपेची शिक्षा सुनावली.