धुळे : येथील आर्थिक गुन्हे शाखेने हाँगकाँग येथील सनशाईन इंटरनॅशनल प्रा.लि. या कंपनीच्या 3 लाख 66 हजार 852 अमेरिकन डॉलर (भारतीय चलनात 3 कोटी 12 लाख 4 हजार 431 रुपये) एवढ्या रकमेच्या विश्वासघात आणि फसवणुकीच्या प्रकरणात धुळ्यातील कंपनी मालक रामप्रसाद अग्रवाल व त्याच्या 9 सहकार्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
इंदोर येथील मनिष गोविंद शर्मा यांनी धुळे येथील आर्थिक गुन्हे शाखा येथे तक्रार दाखल केली होती की, सनशाईन इंटरनॅशनल प्रा.लि. ही कंपनी वित्तपुरवठा करत होती आणि त्यांनी धुळे येथील सनलिंक फोटो व्होल्टीक प्रा.लि. व तेजस इंपेक्स पुणेच्या मालक रामप्रसाद नारायण अग्रवाल यांच्याशी सन 2021 मध्ये संपर्क साधून 3,लाख 66 हजार 852 अमेरिकन डॉलर (भारतीय चलनात 3,कोटी 12,लाख 4 हजार 431 रुपये) फायनान्सिंग करण्याची मागणी केली होती. यानंतर, दक्षिण कोरियातील हानवा टोटल्स कंपनीकडून सोलर प्रोडक्टसाठी कच्चा माल खरेदी करण्यासाठी या रकमेचा वापर केला गेला.
पण काही कालावधी नंतर, रामप्रसाद अग्रवाल आणि अन्य संचालक मंडळाने “माल खराब झाला” असे सांगून फायनान्स कंपनीची घेतलेली रक्कम परत केली नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी धुळे येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली.
या प्रकरणात रामप्रसाद अग्रवाल, हनुमानप्रसाद नारायण अग्रवाल, राकोश सुभाष अग्रवाल, स्नेहा रामप्रसाद अग्रवाल, पवन सुभाष अग्रवाल, नारायण बसतीलाल अग्रवाल, मनिषा राकेश अग्रवाल, पुष्पा पवन अग्रवाल आणि शिलाबाई नारायण अग्रवाल (सर्व रा. धुळे) अशांनी सनशाईन इंटरनॅशनल प्रा.लि. हाँगकाँग ही कमिशन बेसीसवर वित्त पुरवठा करणारी कंपनीची 3 लाख 66 हजार 852 अमेरिकन डॉलर (भारतीय चलनात 3 कोटी 12,लाख 4,हजार 431 रुपये) एवढया रकमेची विश्वासघात करुन फसवणुक केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरोधात विश्वासघात, फसवणूक आणि इतर आरोपांखाली मोहाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.