जळगाव, दीपक महाले : विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीनंतर आता महापालिका निवडणुकांची चर्चा सुरू झाली आहे. विधानसभेला भाजपला मिळालेले यश पाहता, महायुतीतील घटकपक्ष, तसेच महाविकास आघाडीतील सहभागी पक्षांमधील अनेक जण महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. या इच्छुकांनी आतापासूनच भाजपच्या स्यानिक नेत्यांसह पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधत त्यांच्यासोबत काम करण्याची तयारी दर्शविली आहे. दरम्यान, निवडणुकीपासून इच्छुकांनी पक्षाशी संपर्क तोडला असून, ते प्रचारापासून दूर असल्याचे चित्र होते. महायुतीत आधीच तीन पक्ष असल्याने महापालिका निवडणुकावेळी जागा वाटपाचा तिढा वाढण्याची शक्यता आहे.
आता इतर पक्षांमधूनही अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपकडे जाण्याची तयारी केली आहे. दुसरीकडे त्यामुळे विधानसमेत पक्षाचे काम केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचलही सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राजकीय क्षेत्रात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत.
राज्यात अडीच वर्षांपूर्वी बदललेल्या सत्ता समीकरणानंतर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. त्यानंतर जळगावात मूळ शिवसेनेतील ठरावीक पदाधिकारी व कार्यकर्तेच एकनाथ शिंदेसोबत गेले, तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांच्यासह ३० टक्के पदाधिकारी व माजी नगरसेवक अजित पवारांच्या सोबत गेले. मात्र, त्यानंतर लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला मोठे मताधिक्य मिळाले. त्यात सर्वाधिक फटका भाजपला बसला, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या राज्यात दहापैकी आठ जागा निवडून आल्या. त्यामुळे विधानसभेतही महाविकास आघाडीला मताधिक्य मिळेल या आशेवर अनेक जण ‘तुतारी’ आधीच फुंकत होते.
महापालिका निवडणुका झाल्या, तर महायुतीत तीन पक्ष असल्याने तसेच भाजपमधून नगरसेवकपदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी असल्याने आपल्याला उमेदवारी मिळण्याची शाश्वती नसल्याने अनेकांनी ‘तुतारी’ला पसंती देत महाविकास आघाडीकडे जाण्याची तयारी केली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत भाजपला विक्रमी बहुमत मिळाल्याने आता ज्येष्ठ- श्रेष्ठांसह, दिग्गज माजी नगरसेवक भाजपाच्या वाटेवर असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी विधानसभा निवडणुकीवेळी थेट शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाची ताकद कमी झाल्याचे मानले जात आहे.
आता विधानसभा निवडणुकीत महायुतीला विक्रमी मताधिक्य मि ळाल्याने ठाकरे गटाचे अनेक ज्येष्ठ- श्रेष्ठ माजी नगरसेवक भाजपाची वाट धरण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे आगामी काळात महापालिकेच्या राजकारणात नेमक्या काय? घडामोडी घडतात. हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
महापालिकेच्या गत निवडणुकीतून…
महापालिकेच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत तत्कालीन जलसंपदामंत्री तथा भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारले होते. महाजनांनी आपले पूर्वाश्रमीचे राजकीय गुरू सुरेशदादा जैन यांनाही जोरदार धक्का देत चांगलाच धोबीपछाड दणका दिला होता. महाजनांच्या नेतृत्वात महापालिकेत भाजपने ५७ जागांवर निर्विवाद वर्चस्व स्थापित केले होते. त्या वेळी भाजपाने महापालिकेत सत्ता आणली खरी पण राज्यात भाजपने सत्ता गमावली होती. गेल्या वर्षभरात केंद्राचा पैसा वगळता कुठलाही निधी जळगाव महापालिकेला मिळाला नव्हता. अशा परिस्थितीत अनेक नगरसेवकांमध्ये अस्वस्थता दिसून आली होती. भाजपमध्ये राहून निधी मिळत नसल्याने अनेक नगरसेवक शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला लागले होते. भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या जळगावात २०२१ मध्ये भाजपालाच धक्का देत शिवसेना ठाकरे गटाने महापालिकेत सत्ता मिळविली होती. ५७ सदस्य असलेल्या भाजपाकडे महापौरपद होते. मात्र, शिवसेना ठाकरे गटाने भाजपाचे १६ नगरसेवक फोडत महापालिकेत सत्ता बळकावली होती. त्या वेळीही जिल्ह्यात तोडफोडीच्या राजकारणात गिरीश महाजन यांनी जिल्हा परिषद व महापालिकेत सत्ता आणली होती. मात्र, या सत्तेला तोडफोडीच्या राजकारणात सुरुंग लागला होता. भाजपमध्ये गिरीश महाजन पर्व सुरू झाल्यानंतर एकनाथ खडसे यांच्या राजकीय खच्चीकरणाची एकही संधी सोडण्यात आली नाही त्या वेळी महापालिका निवडणुकीत खडसे समर्थक एकाही पदाधिकाऱ्याला भाजपाने उमेदवारी दिली नव्हती.